Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 9 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा
प्रचार शिगेला पोहचला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगरपेट इथे प्रचारसभा
घेतली. ते आज चिकमंगलुरु, बेळगाव आणि बीदर इथेही प्रचारसभा घेणार आहेत, तर राहुल गांधी
बेंगलुरु इथे बैठका घेणार आहेत.
दरम्यान, बंगळुरु इथल्या राज राजेश्वरी नगर मतदारसंघातल्या
एका घरातून हजारो मतदार ओळखपत्रं मिळाल्यानंतर, या प्रकरणी चौकशीचे आदेश निवडणूक आयोगानं
दिले आहेत, तर, या मतदारसंघातली निवडणूक रद्द करावी, अशी मागणी भाजपनं केली आहे.
****
प्रादेशिक जोडणी योजनेअंतर्गत छप्पन्न नवीन विमानतळं
लवकरच कार्यान्वित करण्यावर आपला भर राहील, असं नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी
म्हटलं आहे. उडे देश का आम नागरिक, अर्थात उडान, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सत्तर
प्रादेशिक विमानतळं कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.
****
राज्य मागासवर्ग आयोग मराठा आरक्षणाबाबतचा आपला अहवाल
लवकरच राज्यशासनाकडे सोपवणार आहे. यासंदर्भात विविध आंदोलनांद्वारे मराठा समाज सातत्यानं
मागणी करत आहे. या समाजाच्या आर्थिक मागास पणाच्या संदर्भातल्या सर्वेक्षणाचं काम अंतिम
टप्प्यात असून, त्यानंतर अहवाल राज्यसरकारकडे सोपवणार असल्याची माहिती या आयोगाचे अध्यक्ष,
निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
****
राज्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे, येत्या
१ ऑगस्टला भाऊ अर्थात बांबू हॅण्डिक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिटस सुरु करावीत, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल एका आढावा
बैठकीत दिले. विद्यापीठं ही रोजगार निर्मितीची केंद्रं झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त
करून, ही केंद्रं सुरु झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुद्रा योजनेच्या
मदतीनं स्वयंरोजगाराची लानं उपलब्ध करून दिली जावीत, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी
म्हटलं.
केंद्र शासनानं
बांबू मिशनसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या
भरीव निधीतला अधिकाधिक निधी महाराष्ट्राला मिळेल, यादृष्टीने वन विभागानं प्रयत्न करावा
अशी सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
****
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या नियोजित आंतरराष्ट्रीय
विमानतळाच्या जागेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं अंतिम मान्यता दिली आहे.
केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. या
विमानतळ उभारणीच्या कामाला आता गती मिळेल, असं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष
सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.
****
नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि शिल्पकार नेताजी आबाजी
भोईर यांचं आज पहाटे चार वाजता निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. भोईर यांनी राज्य नाट्य,
संगीत नाट्य आणि कामगार कल्याण नाट्य स्पर्धा गाजविल्या होत्या. त्यांच्या अनेक नाटकांना
तसंच व्यक्तिगत भोईर यांनाही अभिनय आणि नेपथ्याची अनेक बक्षिसं मिळाली होती.
****
पाचोड जवळच्या डोणगाव शिवाराजवळ आज पहाटे साडेपाचच्या
सुमाराला दुधाचा टँकर आणि बोलेरो गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि
अन्य चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. एक नवविवाहित दांपत्य देवदर्शनाला जात असताना
झालेल्या या अपघातात बोलेरो गाडी चालवत असलेल्या वराचा, तसंच त्याच्या बहिणीचा मृत्यू
झाला, तर वधूसह अन्य नातेवाईक जखमी झाले. जखमींना
औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं आज निधन
झालं. ते 65 वर्षांचे होते. आजपासून नवीन स्वरूपात
येणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या स्वागतासाठी गांधी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेले
असताना तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आजपासून पंचवटी
एक्सप्रेस नव्या स्वरूपात आदर्श एक्सप्रेस म्हणून सुरु झाली आहे.
****
पालघर किनाऱ्याजवळ समुद्रात बुडणाऱ्या एका मच्छिमार
बोटीवरच्या सर्व, तेरा मच्छिमारांना तटरक्षक दलानं सुरक्षित किनाऱ्यावर आणलं. आज पहाटे
दोनच्या सुमाराला, बुडणाऱ्या या बोटीनं पाठवलेला मदत मागणारा संदेश मिळाल्यानंतर तटरक्षक
दलानं स्थानिक मच्छिमारांसह या ठिकाणी धाव घेऊन या मच्छिमारांना वाचवल्याची माहिती
पालघर ग्रामीण पोलिसांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment