Thursday, 10 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



१०  मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. विधानसभेच्या २२४ मतदारसंघांपैकी २२३ जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होणार असून, १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ६५५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्व राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणी रॅली आणि सभांचं आयोजन केलं आहे.

****



 अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, क़ृषी शास्त्र पदवी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक एम एच टी- सी ई टी आज होत आहे. राज्यभरातले ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता परीक्षेला सुरुवात झाली.

****



 इमारत आणि बांधकाम कामगार अधिनियमात देण्यात आलेल्या मजुरांच्या व्याख्येत वन मजुरांचा समावेश करावा, अशी मागणी, केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे करणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. इमारत, रस्ते, रेल्वे, पाटबंधारे प्रकल्प, या व अशा इतर अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा बांधकाम व्याख्येत समावेश करण्यात आला आहे.  यामध्ये वन मजुरांचा समावेश समावेश केल्यास, त्यांनाही मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

****

 ग्रामीण भागातली विकासकामं तत्परतेनं पूर्ण करण्याचे निर्देश औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत. जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रस्त्यांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावं, आदी सूचना खैरे यांनी दिल्या.

****



 औरंगाबाद शहराला कचरा समस्येतून मुक्त करण्यासाठी सर्वच यंत्रणा, नागरिकांनी एकत्र यावं, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित महास्वच्छता अभियान बैठकीत काल ते बोलत होते. नियमबाह्य कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईच्या सूचना डॉ. भापकर यावेळी दिल्या.

*****

***

No comments:

Post a Comment