Sunday, 13 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



१३  मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला नेपाळचा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. नेपाळच्या जनतेला भेटण्याची ही एक मोठी संधी होती, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी झालेली चर्चा फलदायी होती, तसंच भारत-नेपाळ संबंधांना या भेटीमुळे एक नवी उर्जा प्राप्त झाली असल्याचं ते म्हणाले. नेपाळचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान काल संध्याकाळी मायदेशी परतले.

****



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब ची पूर्व परीक्षा आज होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४२ उपकेंद्रावर होत असलेल्या या परिक्षेत १५ हजार १९२ उमेदवार बसले आहेत. औरंगाबाद मध्ये घडलेल्या अप्रिय घटनेमुळे या परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, तसंच परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा केंद्रांवर उपलब्ध असून पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

****



 बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रसिद्ध लोणार सरोवर आणि परीसराचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून, मंजूर झालेल्या विकास आराखड्या नुसार विकास कामं गतीनं पूर्ण करावीत, अशा सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत. काल लोणार सरोवर विकास कामांचं भूमीपुजन रावल यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. या भागातल्या दुर्गा टेकडी परीसरातलं सुसज्ज तारांगण आणि अत्याधुनिक उपकरणांद्वारे खगोलशास्त्रीय माहिती देणाऱ्या जागतिक दर्जाच्या खगोलशास्त्रीय संग्रहालयाच्या भूमीपूजनाचा यात समावेश आहे.

****



 औरंगाबाद इथं उसळलेल्या गलीनंतर शहरातली  परिस्थिती आता नियंत्रणात आहे. शहरात शांतता असून, दंगल झालेल्या भागात वाहतूकही सुरळीत सुरु झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

****



 हिंगोली इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत घोटाळा करून नोकरी मिळवणाऱ्या वीस जवानांना समादेशक योगेशकुमार यांनी निलंबित केलं आहे. अधिकारी-परीक्षेसाठी नियुक्त सॉफ्टवेअर कंपनीसोबत संगनमत करून त्यांनी उमेदवारांचे गुण वाढवून नोकरी दिल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.

*****

***

No comments:

Post a Comment