Sunday, 27 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०१ दुपारी १.०० वा.

****



 प्लास्टिक पर्यावरणास घातक असून, त्याचा वापर न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या ४४ व्या भागात ते आज बोलत होते. पृथ्वीला स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी वृक्षारोपणासह विविध उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. येत्या पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचं यजमान पद यंदा भारत भूषवणार असून, हवामान बदल कमी करण्याच्या दिशेनं भारताच्या वाढत्या नेतृत्वाला मान्यता मिळत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. प्लास्टिक पासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर मात, ही यंदाची या दिनाची संकल्पना असल्याचं ते म्हणाले. 



 २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाची तयारी आत्ता पासूनच सुरू झाली असून, आपण सर्व योगाचा वारसा पुढे नेऊन एक आरोग्य शाली, आनंदी आणि सद्भावपूर्ण राष्ट्र निर्माण करुया, असं ते म्हणाले.



 पूर्वीसारखे मैदानी खेळ आता कमी होत चालले असून, मुलांना मोबाईल गेम खेळण्यात जास्त रस दिसत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी, देशातल्या विविध मैदानी, तसंच पारंपरिक खेळांबद्दल माहिती दिली. शाळा, वस्त्या, युवकांनी पुढे येऊन जुन्या पारंपरिक, खेळांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन त्यांनी केलं.



 देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त पंतप्रधानांनी या कार्यक्रमात पंडित नेहरुंचं स्मरण केलं.



 १८५७ साली मे महिन्यातच इंग्रजांविरुद्ध पहिलं स्वातंत्र्यसमर लढलं गेलं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं. अनेक लोक या घटनेला बंड म्हणत होते, मात्र सावरकरांनीच ही घटना स्वातंत्र्यसंग्राम असल्याचं पटवून दिलं, असं ते म्हणाले.



 नौदलाच्या आयएनएसव्ही तारिणी या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणेवर गेलेल्या सहा महिला अधिकाऱ्यांचं, तसंच चंद्रपूरच्या आश्रम शाळेतल्या आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे.



 रमजानचा महिना सुरु असल्यानं ईदच्या चंद्राची लोक वाट बघत असतील, असं सांगून त्यांनी देशवासियांना आगामी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****



 दरम्यान, पंतप्रधानांनी आज दिल्ली-मेरठ राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. १३५ किलोमीटरचा हा महामार्ग देशातला पहिला स्मार्ट आणि हरित महामार्ग आहे. या मार्गावर १२० किलोमीटर प्रति तास गतीनं गाडी चालवण्याची परवानगी असल्यानं यास सर्वाधिक वेगवान महामार्ग म्हटलं जात आहे. गाजियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवल या ठिकाणांना हा महामार्ग जोडला जाणार आहे.

****



 देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात पंडित नेहरुंना अभिवादन केलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतल्या शांतीवन इथल्या पंडित नेहरुंच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****



 केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पंतप्रधानांनी 'नमो अ‍ॅप' वर एक सर्वेक्षण सुरु करून सरकारसह खासदार आणि आमदारांच्या कामाचं मूल्यांकन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आलं होतं. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. सरकारचं कामकाज, आणि विकासकामांवर नागरिकांनी आपल्या भावना आणि मत व्यक्त करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

****



 जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग मधल्या अशाजीपुरा इथं काल हिजबुल मुझाहिदीनच्या कथित दहशतवाद्यांनी एका राजकीय कार्यकर्त्याच्या सुरक्षा रक्षकाकडून दोन रायफल्स हिसकावून घेतल्या, तर कुलगाम इथं खुदवानी परिसरात सैन्याच्या शिबिरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानंही गोळीबार केला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

****



 नाशिक पोलिसांनी एमडी हा अमली पदार्थ विक्री करणारं रॅकेट उध्वस्त केलं असून, या गुन्ह्यातला मुख्य सूत्रधार अरविंदकुमारसह एकूण सात जणांना अटक केली आहे. पोलिसांनी तीन कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

****



 मृदशास्त्रज्ञ डॉ. सु. भि. वराडे यांच्या पहिल्या सरीचा मृद्गंध या आत्मचरित्राचं प्रकाशन आज औरंगाबाद इथं निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment