Thursday, 10 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 10.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 10 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेती आणि शेतकरी हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. तो बँकांचाही प्राधान्यक्रमाचा विषय व्हावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे एकोणचाळिसाव्या बैठकीत ते बोलत होते. बँकांनी शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी पतपुरवठ्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं, उद्दिष्ट साधण्यासाठी लक्ष्याधारित योजना आखावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. शासनाच्या कर्जमाफी योजनेतून किंवा प्रोत्साहन योजनेतून ज्या खातेदारांचे कर्ज माफ झाले, अशा शेतकऱ्यांना बँकांनी तत्काळ कल्पना द्यावी, तसंच येत्या हंगामात त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याची काळजी घ्यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या विविध शहरात बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी शासनानं पुन्हा एकदा आदेश जारी केले आहेत. २००९ मध्ये राज्य सरकारनं महापालिकांना यासंदर्भात दिलेल्या आदेशाची अंलबजावणी होत नसल्यानं नगर विकास विभागानं पुन्हा नव्या आदेशान्वये त्याची आठवण करून दिली. बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात यावं, बेकायदा बांधकामांची यादी प्रसिद्ध करावी, अशा सदनिकांची व्यावसायिक गाळ्यांची नोंदणी करण्यात येऊ नये यासाठी दुय्यम निबंधकांना कळवावं, तसंच ज्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदा बांधकाम होत असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना उपसचिव शंकर जाधव यांनी केल्या आहेत.

****

मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. भुजबळांचे वैद्यकीय अहवाल सामान्य आल्यानं त्यांना सोडण्याचा निर्णय घेतल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाकडून राजेंद्र गावित यांनी, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी, तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी यापूर्वीच अर्ज भरला आहे.

पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून आज सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विश्वजीत कदम यांनी यापूर्वीच काँग्रेसचे उमेदवार म्हणून या जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. २८ मे रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

****

मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या कथित अन्यायकारक कायद्याच्या विरोधात १६ वर्ष उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. इरोम शर्मिला यांच्यासारख्या समाजहितासाठी कार्य करणाऱ्या लोकांची देशाला गरज असल्याचं अण्णा हजारे यावेळी म्हणाले. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीला आपला पाठिंबा असल्याचं इरोम शर्मिला यावेळी म्हणाल्या.

****

आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणाऱ्या राज्यपातळीवरच्या आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेचे सदस्य डॉ.अतुल निरगुडे यांचं आज लातूर इथं निधन झालं. लातुरमधल्या विविध सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक चळवळीत ते सक्रिय होते.

****

औरंगाबादच्या महावितरण कार्यालयातले देयक लिपिक सुशील कोळी यांना चुकीचं बिल पाठवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. वीजदेयक जास्त आलं म्हणून भाजी विक्रेते जगन्नाथ शेळके यांनी औरंगाबाद इथं आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरुन ही कारवाई करण्यात आली.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं आजपासून शहरात बेकायदा नळ जोडणी तोडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्या दिवशी शहरातल्या मोतीकारंजा भागात या पथकानं अनेक विनापरवाना नळ तोडण्याची कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात ९१ जलप्रकल्प साठ्यांमध्ये सद्यस्थितीत केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये सिंचन आणि पिण्याच्या पाण्याकरता नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीन मोठ्या, तर मोताळा, मेहकर आणि देऊळगावराजा या लहान प्रकल्पांचा वापर होतो. लघु स्वरुपाचे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत मिळून ८१ प्रकल्प असून, तेथील जलसाठा खालावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या धुळे तालुक्यातल्या ४३ आणि शिंदखेडा तालुक्यातल्या ३१ गावांना प्रत्येकी दीड लाख रुपये याप्रमाणे एकूण एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली. हा निधी जलसंधारणाची कामं करणाऱ्या गावांना प्रोत्साहन मिळण्यासाठी उपलब्ध करण्यात आला असून, तो स्पर्धा कालावधीमध्ये खर्च करता येईल.

****

No comments:

Post a Comment