Friday, 18 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.05.2018 - 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या सत्ता स्थापनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना, राज्यपालांनी, कमी संख्याबळ असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, याविरोधात या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या अरनिया, आर एस पुरा आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे एक जवान शहीद झाले, तर तीन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी लष्करी तळांना लक्ष करत अंदाधुंद गोळीबार सुरु केला. झारखंड सीमा सुरक्षा बलाचे जवान सीताराम उपाध्याय हे अरनिया इथं झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते, नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही ठिकाणी आज सकाळपर्यंत गोळीबार सुरु होता.

****

ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी प्रसिध्द शिल्पकार उत्तम पाचारणे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली. पाचरणे एक प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी कला क्षेत्राच्या विविध पदांवर काम केलं आहे. सध्या ते गोवा कला अकादमीचे सदस्य आणि सल्लागार समिती सदस्य, पु.ल  देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आणि बोरिवली इथल्या जनसेवा सहकारी बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत.

****

रायगड जिल्हयातल्या खांदेरी बेटावर शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणऐंशी मध्ये बांधलेल्या खांदेरी किल्याचं राज्य संरक्षित स्मारक होणार असल्याची माहिती राज्य पुरातत्व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी दिली आहे. या संदर्भातली अधिसूचना जाहीर झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेसाठी प्रस्ताव दाखल केला जाईल, असं ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाचं सह्याद्री प्रतिष्ठाननं स्वागत केलं आहे.

****

नांदेड शहरात, माळटेकडी परिसरात असलेल्या फळ भाजीपाला बाजारासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली आहे. महापालिकेनं या परिसरातलं अतिक्रमण काढल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी केली होती.

****

No comments:

Post a Comment