Wednesday, 9 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 09.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 9 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात ओजस आंतरराष्ट्रीय शाळा उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तेरा शाळांची निवड झाली असून, त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या शिराढोण इथली जिल्हा परिषद प्रशाला आणि परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या माळीवाडा इथली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, यांचा समावेश आहे. येत्या जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या या तेरा शाळांसाठी सत्तर शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्तम शिक्षण देण्यासाठी, सरकारी शाळांमधून ओजस आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

****

राज्यातले करदाते आणि वाहतुकदारांनी ई वे बिल पद्धतीसाठी तत्काळ नोंदणी करण्याची सूचना प्रशासनानं जारी केली आहे. पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची राज्यांतर्गत वाहतूक करण्यासाठी येत्या पंचवीस तारखेपासून ई वे बिल पद्धत अनिवार्य करण्यात येत आहे. राज्य कर आयुक्तांनी काल याबाबतची अधिसूचना जारी केली. यासाठी संबंधितांनी www.ewaybillgst.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागानं केलं आहे.

****

समाज माध्यमांवरून महिलांबाबत होणारी अवमानकारक वक्तव्यं रोखण्यासाठी विशेष सायबर डेस्क उभारण्याचा निर्णय राज्य महिला आयोगानं घेतला आहे. समाज माध्यमांवर नियमन करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याची, तसंच या माध्यमांवरून महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं करण्याचं प्रमाण वाढल्याची दखल घेत आयोगानं हा निर्णय घेतला आहे. याबाबतीत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परिषद घेण्याचंही आयोगानं ठरवलं आहे. यासंदर्भात आयोगानं स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.

****

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या सर्वेक्षणाचं, पालघर जिल्ह्यातल्या टेंभी - खोडावे इथे सुरू असलेलं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज बंद पाडलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध करत, मोजणीच्या सामानाची फेकाफेक केल्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातही मनसे कार्यकर्त्यांनी असाच विरोध केला होता.

****

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन अनेक प्रवासी जखमी झाले. फुलंब्रीकडे जाणारी बारामती - रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरम्यान टक्कर झाली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.

****

जालना शहरातल्या बालाजीनगर इथला रास्त भाव दुकानदार नंदकिशोर अग्रवाल आणि त्याचा मुलगा स्वप्नील अग्रवाल यांच्यावर तीनशे रुपये लाच घेतल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला धान्याचं वाटप सुरू करण्यासाठी या दुकानदारानं ही लाच मागितली होती.

****

विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयांना आरक्षित संवर्गातील शिक्षक तसंच शिक्षकेतर रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी सूचना करत असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिध्दार्थ खरात यांनी सांगितलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आरक्षण कक्षातर्फे आज संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांसाठी ‘आरक्षण ध्येय धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेच्या उद्धाटनपर भाषणात खरात बोलत होते. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पुरण मेश्राम यांनी यावेळी ‘घटनात्मक आरक्षणाची जबाबदारी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

****

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन, या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी आणि लाभार्थींच्या कुटुंबांच्या अतिरिक्त माहितीचं संकलन करण्याचं काम राज्य शासनाकडून सुरू असून, लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या इच्छुक लाभार्थी कुटुंबांनी या कामात सहकार्य करावं, असं आवाहन या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रती वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment