Saturday, 2 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.06.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी क्षेत्रा समोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. सिंगापुरमध्ये झालेल्या शंगरीला चर्चासत्रात ते बोलत होते. जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकमेकांचा आदर, संवाद, सहकार्य, शांती आणि समृद्धी या पंचसूत्रीचा वापर करावा, असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय  कायद्यानुसार नौवहनाबाबतचं स्वातंत्र्य आणि वादांवर शांततामय रीतीनं तोडगा काढला तर सर्व राष्ट्र समृद्धी आणि विकासाच्या वाटेवर घोडदौड करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****



 इंधन दरवाढीच्या समस्येवर मात करण्यासाठी इथेनॉल सारख्या अपारंपारिक इंधनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन, दीर्घकालीन उपाय शोधण्यावर केंद्र सरकार काम करत असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं सुरू केलेल्या योजनांमुळे लोकांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याचं, गडकरी म्हणाले.

****



 केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना येत्या सहा जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. आयएनएक्स मीडियाशी संबंधित मुद्यांवर यावेळी चौकशी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांना तीन जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

****



 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे. एसटीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात समानीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे अनेक निर्णयही तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनाही, रावते यांनी काल जाहीर केली. सुमारे एक लाख ५ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment