Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४
जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø जलसंधारणातला ‘इंद्रप्रस्थ जलभूमी
अभियानाचा लातूर पॅटर्न संपूर्ण
राज्यात राबवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø वडार समाजाच्या विकासासाठी कामगार मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्तीची घोषणा
Ø कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनंही लिंगायत धर्माला
मान्यता देण्याची अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीची मागणी
आणि
Ø एच.एम.टी. तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचं निधन
****
जलयुक्त
शिवारच्या यशानंतर आवारातलं पाणी मुरवण्यासाठी ‘इंद्रप्रस्थ जलभूमी
अभियान’ लातूर जिल्ह्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यशस्वीपणे राबवलं
असून, जलसंधारणातील हा नवा लातूर पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते
काल लातूर इथं इंद्रप्रस्थ जलभूमी
अभियानातल्या जलयोद्ध्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी
जलसंधारणमंत्री राम शिंदे, संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार
सुनील गायकवाड, आदी मान्यवर
उपस्थित होते. जिल्हा परिषदेनं दिव्यांगासाठी सुरु केलेल्या ‘संवेदना’ या ऍपचा प्रारंभही यावेळी करण्यात आला.
रचनात्मक
कामातूनच सामाजिक परिवर्तन होत असते आणि रचनात्मक कार्यात पाणी हा
महत्वाचा घटक आहे. ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागलं
तोच लातूर जिल्हा टॅंकरमुक्त झाला आहे. त्यासाठी पालकमंत्री, जनता
आणि प्रशासनानं जे काम केले आहे ते महत्वाचे असून तुम्हीच खरे
जलनायक आहात, अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली.
****
लातूर शहरात झालेल्या वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यालाही काल मुख्यमंत्री फडणवीस
यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी वडार समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य
सरकार सकारात्मक असल्याचं, सांगितलं. वडार समाजाच्या विकासासंदर्भात कामगार मंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची घोषणा त्यांनी केली.
या समितीनं तीन महिन्यात आपला अहवाल सादर करावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, अहमदपूर
इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण काल
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत
करण्यात आलं. यावेळी एका सभेलाही त्यांनी मार्गदर्शन केलं.
****
वस्तू आणि सेवाकरा अंतर्गत साखरेवर
उपकर आकारणी विषयावरच्या मंत्रीगटाची काल मुंबईत बैठक झाली. आसामचे अर्थमंत्री हेमंथा
बिस्व सर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इथेनॉलचा कर दर १८ टक्क्यांवरून
कमी करून ५ टक्के करणं, साखर निर्यात अनुदानात दुप्पट वाढ, ऊस उत्पादकांप्रमाणे इतर
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी उत्पादनांवर उपकर लावणं, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी
कल्याण निधी निर्माण करता येऊ शकेल का, या
सर्व पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली.
वस्तु आणि सेवाकर कायदा करतांना १७
कर आणि २३ उपकर यात विलीन झाले. या पार्श्वभूमीवर साखरेवर
उपकर आकारण्याबाबत कायद्यातले प्रावधान समजून घेण्यासाठी महालेखापालां अंतरगत
अहवाल मागवण्यात आला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
मदत करण्यासाठी एक भक्कम व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न असल्याचं राज्याचे अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलं. समिती सर्व पर्यायांचा अभ्यास करून जी.एस.टी.
परिषदेला अहवाल सादर करेल, असं ते म्हणाले.
****
पर्यटनाला चालना
देण्याच्या उद्देशानं वेरुळ - अजिंठा, हंपी आणि बोधगया सारख्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रांच्या
बैठका आणि संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात ही माहिती
देण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी पर्यटन
स्थळांच्या ठिकाणी बैठक घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.
यासंदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागानं पर्यटन मंत्रालयासोबत चर्चा केल्यानंतर, विकसित
करण्याची गरज असलेल्या पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
सत्तेसाठी तडजोड
न करता जनतेसाठी वेळ प्रसंगी संघर्ष करा, अशी शिकवण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी
दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यात परळी इथल्या गोपीनाथ गडावर आयोजित सामाजिक उत्थान दिन
कार्यक्रमात ते काल बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार छत्रपती संभाजीराजे,
खासदार उदयनराजे भोसले, खासदार
प्रितम मुंडे, यांच्यासह अनेक मंत्री
यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास मुंडे यांच्या नावाशिवाय
पूर्ण होत नाही, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना
यावेळी
सन्मानित करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथंही शासकीय
दूध डेअरी परिसरात आयोजित अभिवादन सभेत, गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण करण्यात
आली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पूर्वमोसमी
पावसामुळे राज्यातल्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसात मराठवाड्यात
अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात कालही अनेक ठिकाणी
पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा
पाऊस झाला. जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचं वृत्त आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या
अकोले तालुक्याला काल सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं,
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
कर्नाटक
सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनंही लिंगायत धर्माला मान्यता द्यावी या मागणीसाठी
काल सोलापूर इथं, अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने
महामोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचं सभेत रुपांतर
झालं. केंद्र सरकारनं लिंगायत धर्माला संवैधानिक तसंच राष्ट्रीय स्तरावर
अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
****
मलेशियातल्या क्वालालांपूर इथं
सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल मलेशियाचा
१४२ धावांनी पराभव केला. भारतानं
वीस षटकांत तीन बाद १६९ अशी
धावसंख्या उभारली. भारतीय गोलंदाजांनी मलेशियाचा संपूर्ण संघ २७ धावांत गारद केला, त्यापैकी सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. पूजा
वस्त्राकारनं तीन गडी बाद केले. या स्पर्धेत सहावेळा अजिंक्य पद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना आज थायलंड विरुद्ध होणार आहे.
****
कृषी संशोधक आणि एच.एम.टी. तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे
यांचं काल निधन झालं. ते एकोणऐंशी वर्षांचे होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी
अर्धांगवायुचा झटका आला होता.
तांदळाचे एच.एम.टी.सह एकूण नऊ वाण त्यांनी विकसित केले होते. अल्प शिक्षण झालेल्या
खोब्रागडे यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये विविध प्रयोग केले होते. राज्य सरकारनं कृषीभूषण
पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या
नांदेड या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोब्रागडे यांना
श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या डॉ. इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात शिखर कन्या अॅडवेंचर्स स्पोर्टस्
कल्बची स्थापना करण्यात येणार असल्याची
माहिती आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक
प्राध्यापक मनिषा वाघमारे यांनी दिली आहे. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट
सर केल्याबद्दल वाघमारे यांचा काल महिला महाविद्यालयात सत्कार
करण्यात आला, त्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. मराठवाड्यातून
२०२४ पर्यंत एका महिला गिर्यारोहकाला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी
प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माउंट एव्हरेस्ट सर करतानाचे
चित्तथरारक अनुभव वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
****
नांदेड आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे
सहायक संचालक भीमराव शेळके यांचा काल सेवानिवृत्ती निमित्त नांदेड वासियांतर्फे गौरव
करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत यांच्या हस्ते शाल,
श्रीफळ आणि मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी आकाशवाणीच्या वाणिज्य विभागाचे
प्रमुख सहायक संचालक भुपेंद्र मिस्त्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या
माध्यम शास्त्र विभागातले प्राध्यापक राजेंद्र गोणारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते. उपस्थित वक्त्यांनी यावेळी आपल्या भाषणात शेळके यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख
केला.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती
परिसरात काल पशू प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात ‘जाफराबादी शेरु’ हा बैल
आणि महाद्या रेडा पाहण्यासाठी पशूपालकांनी गर्दी केली होती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी
यांनी यावेळी उपस्थितांना प्रदर्शनातल्या पशूंबाबत माहिती दिली.
****
रत्नागिरीजवळच्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर
मुंबईतून आलेल्या पाच पर्यटकांचा काल बुडून मृत्यू झाला. मुंबईतून गणपतीपुळे इथं
आलेले सात पर्यटक रत्नागिरीकडे निघाले होते. वाटेत आरे-वारे इथं ते समुद्रात
आंघोळीसाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यात पाच जणांचा मृत्यू
झाला तर एकाला वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आलं.
****
हिंगोली शहरात गाडीपुरा भागातल्या एका गोदामातून
एक लाख १० हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी काल जप्त केला. याप्रकरणी
शहर ठाण्यात गुन्हा नोंदवीण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment