Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५
जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र
आणि गोव्यात पूर्णतः सक्रीय होईल- हवामान विभागाचा अंदाज
Ø वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश
चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर; नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा
Ø विधानपरीषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार घोषित;
मुंबई पदवीधर मतदारसंघात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना
उमेदवारी
आणि
Ø मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री
प्रकाश सोळुंके तर सचिव पदी आमदार सतीश चव्हाण यांची फेरनिवड
****
नैऋत्य
मोसमी पाऊस येत्या शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात पूर्णतः सक्रीय होईल,
असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी काल पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात काल वळीवाचा पाऊस झाला. पावसानं काही काळ जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग
आणि रत्नागिरी या तळ कोकणातल्या जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला.
उत्तर
मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात काल लक्षणीय घट झाली. उद्या सकळ पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात
काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल, असा
हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या
राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी- नीट परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. सर्वोच्च न्यायालयानं
या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल
हा निकाल जाहीर केला. या परीक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल हा देशात सातवा आला आहे.
कल्पना कुमारी ही दिल्लीची विद्यार्थिनी या चाचणीत पहिली आली आहे. एकूण ५४ टक्के परीक्षार्थी
या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
****
आगामी विधानपरीषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपले
उमेदवार काल जाहीर केले. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक
सावंत यांच्याऐवजी बोरीवलीचे शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्यात
आली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजी शेंडगे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर
दराडे, आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर डॉक्टर
सावंत यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचं,
वृत्त आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी पक्ष कार्यासाठी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती
पक्षाकडे केल्यामुळे त्यांना निवडणुकीसाठीचे तिकिट देण्यात आलं नसल्याचं, शिवसेनेच्यावतीनं
सांगण्यात आलं.
****
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय
जनता पक्षाचा झालेला पराभव ही लहान गोष्ट नसून, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं
आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांनी केलं आहे. मुंबईत काल
ते वार्ताहरांशी बोलत होते. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत जरी भाजपला विजय मिळाला, तरीही
भाजप विरोधी मतंही तितकीच पडली असल्याचं पवार म्हणाले. सर्व विरोधी पक्षांना एकत्र
आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यावरण दिन
आज देशभर साजरा केला जात आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारत भूषवणार असून,
प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणं, ही यंदाच्या पर्यावरण दिनाची सकंल्पना
आहे. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या
अध्यक्षपदी, माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांची फेरनिवड झाली. तर या मंडळाच्या उपाध्यक्षपदी,
विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडीत आणि सलीम शेख, तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण यांची
निवड झाली. सहसचिवपदी अनिल नखाते आणि प्रभाकर पालोदकर, तर कोषाध्यक्षपदी डॉ. अविनाश
येळीकर निवडून आले. विरोधी गटाच्या उमेदवारांना सरासरी ५० मते मिळाली.
****
राष्ट्रीय किसान महासंघानं पुकारलेल्या संपानिमित्तं
काल चौथ्या दिवशी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
विविध शेतकरी संघटनांनी एकत्रपणे घंटानाद आंदोलन करून विविध मागण्या मांडल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या कायगाव इथं,
रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन
करण्यात आलं. दरम्यान, बीड इथं या आंदोलना दरम्यान पोलिसांनी रस्त्यावर चूल पेटवण्यास
विरोध केल्यानं,पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी, राष्ट्रवादी
काँग्रेस महिला आघाडीच्या बीड इथल्या अध्यक्षा, रेखा फड यांच्यासह अन्य सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
****
पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं, काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा
समोरचं महिलांनी पिठलं- भाकरीचा स्वयंपाक करण्यासाठी चुली मांडल्या होत्या. पेट्रोल
आणि डिझेल दरवाढी मुळे पाल्यांच्या शालेय वाहतुकीचा खर्च ३० टक्क्यांनी वाढणार आहे,
गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत, स्वस्त धान्य दुकानात केशरी शिधा पत्रिका धारकांना
मिळणारं धान्य सध्या अनेकांसाठी बंद करण्यात आलं आहे, आणि महागाईच्या या दिवसात दुकानांमध्ये
देय मालही सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचा आरोप या महिलांनी केला.
****
कृषी क्षेत्रातले उत्तमोत्तम प्रयोग, आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचं उत्पन्न
वाढवण्याच्या उद्देशानं, १ जून ते ३१ जुलै २०१८ दरम्यान राज्यातल्या उस्मानाबाद, नंदूरबार,
वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी २५, अशा एकूण १०० गावांमध्ये कृषी
कल्याण योजना राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांतल्या
प्रत्येक शेतकऱ्याला मृदा आरोग्य पत्रिकांचं वितरण करणं यासारखे, विविध उपक्रम हाती
घेतले जात आहेत, तर मधुमक्षिका पालन, मशरुमची लागवड आणि स्वयंपाक घरातील बाग अशा उपक्रमांबाबत
प्रत्येक गावात माहिती आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातलं वैरागड,
हे गांव, आदर्श ग्रामच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्यावतीनं
जिल्हाधिकारी, जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे
मुख कार्यकारी अधिकारी, डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते काल गाव
धुर मुक्त करण्यासाठी उज्वला योजने अंतर्गत,
५५ कुटुंबांना गॅसचं वितरण करण्यात आलं.
त्याचबरोबर गावातल्या
सुशिक्षित युवकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी, प्रधानमंत्री मुद्रा ऋण योजने अंतर्गत प्रत्येकी
पन्नास हजार रुपयांचं मुद्रा कर्जही वितरित करण्यात आलं.
****
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक
विमा योजनेंतर्गत मोसंबी, संत्रा, पेरू या फळ पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी, १४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली
आहे. या योजनेंतर्गत, फळ पिक निहाय विमा संरक्षण रक्कम, सहकार विभागानं मंजूर केलेल्या
कर्ज दरा एवढी निर्धारित करण्यात येईल. ही योजना, २० हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक
फळपिक क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांतर्गत राबवण्यात येत आहे. कर्जदार
शेतकऱ्यासाठी ही योजना सक्तीची असली, तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. त्यामुळे विमा हप्ता संरक्षित
रकमेच्या पाच टक्के एवढा निर्धारित करण्यात आला
आहे.
****
प्रधानमंत्री
पीक विमा योजनेत उस्मानाबाद आणि लोहारा या दोन तालुक्यातल्या, ६६
हजार ३१३ शेतकऱ्यांच्या, सोयाबीन पिकाचं नुकसान होऊनही पीक कापणी प्रयोग वस्तूनिष्ठ झाले
नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचा आरोप, राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना केला.
या बाबत कृषी आयुक्त आणि सचिवांकडे, या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात
खरीप हंगामासाठी ग्रामीण आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून, १९ हजार, ६५८ शेतकऱ्यांना
आतापर्यंत ८८ कोटी, ५६ लाख, ८२ हजार रुपयांच्या पीककर्जाचं वाटप करण्यात आलं असल्याची
माहिती काल राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, आणि व्यापारी बँकांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत
देण्यात आली. पीककर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देताना, कोणतंही शुल्क
आकारण्यात येऊ नये, पीककर्ज वाटपाच्या तक्रारी
येणार नाही याची बँकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना या वेळी अप्पर जिल्हाधिकारी पी. बी.
खपले यांनी दिल्या.
****
मलेशियात क्वालांलपूर इथं सुरू असलेल्या,
आशियाई महिला टी- ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय महिला संघानं थायलंडच्या महिला
संघांचा, ६६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करतांना भारतीय महिला संघानं निर्धारित
वीस षटकात, ४ बाद १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल थायलंडचा संघ आठ बाद ६६ धावाचं
करू शकला.
*****
***
No comments:
Post a Comment