Thursday, 7 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.06.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 जून २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 नाशिक जिल्ह्यात चांदवड जवळ आज ट्रक आणि लक्झरी बसच्या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तेरा जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. मृत सर्वजण उल्हासनगर आणि कल्याणचे रहीवाशी आहेत. जखमींना उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आलं आहे.

****



 शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा नैसर्गिक आपत्ती अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे. या रकमेत वाढ करावी अशी मागणी लोकप्रतिनिधीं कडून होत होती, त्यानुसार हा निणर्य घेतल्याचं सावरा यांनी सांगितलं. अनुदानित आश्रमशाळा अथवा नामांकित शाळांमध्ये अशा घटना घडल्यास अनुदानाची ५० टक्के रक्कम शासनाकडून आणि ५० टक्के रक्कम संबंधित संस्थेतर्फे देण्यात येईल असं ते म्हणाले.

****



 धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी विधानपरिषद निवडणूकीत मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. राज्यातल्या चार जागांसाठी येत्या आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यात जातीयवादी शक्तींना दूर राखण्यासाठी, मित्रपक्षांच्या उमेदवारांना सहकार्य केलं जाणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचं, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****



 गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांना काल न्यायालयानं जामीन मंजुर केला. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत काल बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाके वाजवून तसंच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

****



 सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात येत्या १५ जूनपासून १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीवहन -एस.टी. महामंडळानं काल दिली आहे . डिझेलचे वाढते दर तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे.

*****

***

No comments:

Post a Comment