Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 7 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ जून २०१८ दुपारी १.०० वा.
****
प्रत्येक नागरिकाला स्वस्त आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या
लाभार्थ्यांशी आज पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी
ते बोलत होते. औषधांची उपलब्धता ही गरिबांसाठी चिंतेची बाब असून, स्वस्त औषधांच्या
उपलब्ध ते साठीच ही योजना सुरु केली असल्याचं ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानही स्वस्थ
भारताच्या निर्माणात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशभरात तीन
हजार जनऔषधी केंद्रं सुरु असून, त्या ठिकाणी विविध आजारांवरची ७०० पेक्षा जास्त औषधं
उपलब्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या
केरन परिसरात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले.
आज पहाटे दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केला, त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
सकाळपर्यंत ही चकमक सुरू राहिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झारखडंमधल्या सराय
केला परिसरात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक कमांडो
हुतात्मा झाले, तर एक पोलिस जखमी झाले. आज पहाटे ही चकमक झाली.
****
संयुक्त जनता दलाचे
माजी अध्यक्ष आणि बंडखोर खासदार शरद यादव यांचे वेतन आणि भत्ते थांबवण्याचा आदेश सर्वोच्च
न्यायालयानं दिला आहे. यादव यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेवरच्या दिल्ली
उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर अंतिम निर्णय होई पर्यंत त्यांना कुठलंही वेतन आणि भत्ते
मिळणार नाहीत, मात्र त्यांना सरकारी निवास स्थानात राहता येणार असल्याचं न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे.
****
चालू
आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सात पूर्णांक तीन दशांश
टक्के विकासदरानं प्रगती करेल, तर पुढच्या दोन
वर्षात साडे सात टक्के इतका विकासदर गाठेल, असा
अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जागतिक आर्थिक परिणामांविषयीच्या या महिन्यातल्या अहवालात
बँकेनं हा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारतीय
वैद्यकीय परिषदेनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं, देशातल्या ८२
वैद्यकीय महाविद्यालयांवर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास
बंदी घातली आहे. या महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असून, शिक्षकांचीही कमतरता
असल्याचं निरीक्षण परिषदेनं नोंदवलं आहे. या ८२ महाविद्यालयांपैकी ७० खाजगी, तर
१२ सरकारी आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं महाविद्यालयांवर बंदी आल्यानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दरवर्षी उपलब्ध असलेल्या ६४ हजार जागांपैकी १० हजार जागा यंदा
कमी होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात
एक लाख प्रसूतींमध्ये माता मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. काल
प्रसिद्ध झालेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या वृत्तांकानुसार अशा मृत्यूंचं प्रमाण २०१३
सालापासून २२ टक्यांनी कमी झालं आहे. २०११ ते २०१३ या काळात बाळंतपणात मृत्यू पावणाऱ्या मातांचं प्रमाण एक लाख जिवंत बालकांमागे एकशे सदुसष्ठ होतं, ते २०१४
ते २०१६ या काळात १३० पर्यंत
खाली आलं. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघानं ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक
यश सरकारला मिळालं असल्याचं ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा
यांनी केलं आहे.
****
देशातल्या अनेक भागांना भेडसावत असलेल्या भूजल समस्येवर
मात करण्यासाठी अटल भू जल योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. अर्थ
मंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मान्यता मिळणं अद्याप बाकी असल्याचं जलसंपदा
मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक बँकेनं या योजनेसाठी सहा हजार कोटी रूपयांचं आर्थिक
सहाय्य मंजूर केलं असून, महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यात ही योजना प्राधान्यानं राबवली
जाणार आहे.
****
रुग्णालय रेल्वे समजली जाणारी ‘लाईफलाईन एक्सप्रेस’
पुढच्या आठवड्यात राज्यात येत आहे. येत्या पंधरा तारखेपासून सहा जुलैपर्यंत ती लातूर
रेल्वे स्थानकात असेल. देशभरातल्या गरीब, तसंच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, भारतीय
रेल्वेनं ‘इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन’ या बिगर सरकारी संस्थेसोबत ही रुग्णालय रेल्वे
१९९१ मध्ये सुरू केली होती. पाच डब्यांच्या या गाडीमध्ये ऑपरेशन थिएटरही उपलब्ध आहे.
आतापर्यंत या रेल्वेच्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक गरीब आणि दिव्यांग रुग्णांवर
नि:शुल्क उपचार करण्यात आले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment