Saturday, 23 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 23 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

येणाऱ्या काळात महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये सर्व सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या राजगढ इथं आज मोहनपुरा धरणाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. विविध योजना या देशाचा गतीनं होणाऱ्या विकासाचं उदाहरणच नाही, तर यामुळे सरकारच्या कामाचं स्वरुप देखील लक्षात येतं, असं ते म्हणाले. या धरणात सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आला असून, यामुळे पाईपलाईनद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवता येईल, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी यावेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं स्मरण केलं. कौशल्य विकास, स्टार्ट अप, मुद्रा योजना, मेक इन इंडिया या सगळ्या योजनांमध्ये मुखर्जींच्या विचारांची झलक असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर इंदूरमध्ये आयोजित शहरी विकास महोत्सवात सहभाग घेत पंतप्रधानांनी, अनेक शहरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. 

****

दरम्यान, पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ४५वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

ग्रीस, सुरीनाम आणि क्युबाच्या यशस्वी दौऱ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रपतींचा तीन देशांचा दौरा यशस्वी झाल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. सौर उपकरणांच्या हस्तांतराला सुरीनामच्या अध्यक्षांनी मंजुरी दिली. प्रक्षेपण नेटवर्क सक्षम करण्यासाठी २७ दशलक्ष डॉलर्स साह्याची भारतानं घोषणा केली. भारत आणि क्युबानं जैव तंत्रज्ञान, पुनर्नविकरणीय ऊर्जा आणि पारंपरिक औषध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यास मान्यता दिली.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज कोकण विभागाच्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत प्रभू यांनी, शेती, सेवा आणि उत्पादन क्षेत्राच्या विकासावर अधिक चर्चा केली. भौगोलिक संकेतांक-जियोग्राफीकल इंडिकेटर्सच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांविषयी जनजागृती करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रभू यांनी रत्न आणि दागिने, तसंच पॅकेजिंग क्षेत्राचाही आढावा घेतला.

****

राज्यात आजपासून प्लास्टिकबंदी लागू झाली असून, ठिकठिकाणी प्लास्टिक उत्पादक व्यापारांवर आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. लातूर महानगरपालिकेनं आज शहरातल्या व्यापारांवर कारवाई करुन शंभर किलो प्लास्टिक जप्त केलं. उद्या आणि परवा लातूर शहरात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा शास्त्रीय विल्हेवाटीसाठी महानगरपालिकेच्या संकलन केंद्राकडे किंवा नागरिकांनी घंटागाडीकडे हस्तांतरीत करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेचे घनकचरा प्रमुख, वॉर्ड अधिकारी आणि आरोग्य अधिकारी हे नियमानुसार प्लास्टिक वितरित करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणार असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं. प्लास्टिक बंदीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्लास्टिक बंदीची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे महानगरपालिकेनंही आज कारवाई करत दोन हजार ५०० किलोचा साठा जप्त केला, तर ९५ हजार रुपये दंड वसूल केला. जिल्ह्यात प्लास्टिक संकलन केंद्र आणि वाहनांच्या माध्यमातून प्लास्टिक गोळा करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, प्लास्टिक बंदी आदेशातल्या दंडाच्या रकमेत काहीही सवलत देण्यात आलेली नाही. उल्लंघन करण्याऱ्यांवर प्रथम पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड ते पिंपळगाव दरम्यान शिरवाडे फाटा इथं एसटी बस आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना तातडीनं नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

****

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत पाच जुलै पर्यंत असून, सहा जुलैला अर्जांची छाननी होईल, नऊ जुलैपर्यंत अर्जमागे घेता येतील. या ११ सदस्यांचा कालावधी २७ जुलैला संपणार आहे.   

****

हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली असून कालपासून ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औंढा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, कयाधू, आसना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाशिम, बुलडाणा, हिंगोली, नाशिक जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाचं वृत्त आहे.

****

No comments:

Post a Comment