Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 3 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशभरातल्या
शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक बनून प्लास्टिक प्रदूषण रोखण्यात सरकारला
मदत करावी, असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. येत्या
पाच जून रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी
दिल्लीत आयोजित ‘एन्व्हीथॉन’ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत ते बोलत होते. पर्यावरण रक्षणाचा
संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभाग झाले. कुठलंही
ध्येय गाठण्याचा मुलांमध्ये असलेला जोम आणि उत्साह, इतरांनाही प्रोत्साहीत करतो, मुलांनी
पर्यावरणाच्या दृष्टीनं उपयोगी एकतरी काम दररोज करावं असं त्यांनी सांगितलं. उपस्थित
मुलांना यावेळी पर्यावरणाभिमूख राहण्याची तसंच दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे
बंद करण्याची शपथ डॉ.हर्षवर्धन यांनी दिली.
****
राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकार हे सर्वसमावेशक, भेदभावरहीत विकासासाठी कटीबद्ध असल्याचं केंद्रीय
अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला चार
वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज पणजी इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. अल्पसंख्याक
समाजातल्या मुलींसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम
खर्च करण्यात आली असून, अल्पसंख्याकांसाठी पाच लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्यात
आल्याचं नक्वी यांनी यावेळी सांगितलं.
****
पर्यटनाला
चालना देण्याच्या उद्देशानं वेरुळ - अजिंठा, हंपी आणि बोधगया सारख्या ठिकाणी सार्वजनिक
क्षेत्रांच्या बैठका आणि संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. एका शासकीय प्रसिद्धी
पत्रकात ही माहिती देण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या
कंपन्यांनी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बैठक घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दिले होते. यासंदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागानं पर्यटन मंत्रालयासोबत चर्चा
केल्यानंतर, विकसित करण्याची गरज असलेल्या पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आल्याचं
याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सत्तेसाठी
तडजोड न करता जनतेसाठी वेळ प्रसंगी संघर्ष करा, अशी शिकवण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे
यांनी दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या
पुण्यतिथीनिमित्त परळी इथल्या गोपीनाथ गडावर आयोजित ‘सामाजिक उत्थान दिन’ कार्यक्रमात
ते बोलत होते. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार प्रितम मुंडे,
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचा
सामाजिक राजकीय इतिहास मुंडे यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही, असं सांगून, मुख्यमंत्र्यांनी
त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी
पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
औरंगाबाद
इथल्या डॉ.इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात शिखर कन्या अॅडवेंचर्स स्पोर्टस् कल्बची
स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक प्राध्यापक मनिषा
वाघमारे यांनी दिली आहे. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल वाघमारे
यांचा आज महिला महाविद्यालयात सत्कार करण्यात आला, त्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत
होत्या. मराठवाड्यातून २०२४ पर्यंत एका महिला गिर्यारोहकाला माउंट एव्हरेस्ट शिखर सर
करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माउंट एव्हरेस्ट सर
करतानाचे चित्तथरारक अनुभव वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
****
गेल्या
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातल्या तापमानात लक्षणीय
घट झाली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे.
दरम्यान,
राज्यात आजही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळी काही
ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी
पावसाचं वृत्त आहे.
अहमदनगर
जिल्ह्यातल्या अकोले तालुक्याला आज सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला. या घटनेत सुदैवानं
कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
क्वालालांपूर
इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं मलेशियाचा
१४२ धावांनी पराभव केला. भारतानं वीस षटकांत तीन बाद १६९ अशी धावसंख्या उभारली. भारतीय
गोलंदाजांनी मलेशियाच्या सहा फलंदाजांना शून्यावर बाद करुन तंबूत पाठवलं. पूजा वस्त्राकारनं
तीन गडी बाद केले. या स्पर्धेत सहावेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट
संघाचा सामना उद्या थायलंड विरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment