Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 4 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
विकासाच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांच्या आयुष्यात
सुधारणा घडवून आणण्यासाठी दिशादर्शक योजना आखण्यात राज्यपाल महत्त्वाची भूमिका
बजावू शकतात असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या
सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू
झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या प्रशासनात राज्यपालांचं
स्थान अतिशय उच्च असतं असं राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची
एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून, येत्या
दोन ऑक्टोबर पासून पुढचे २४ महिने याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी
माहितीही त्यांनी दिली. उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांना देशाची
सांघिक संरचना आणि संवैधानिक व्यवस्थेत महत्वाची भुमिका पार पाडायची असल्याचं पंतप्रधान
यावेळी म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपीयां जिल्ह्यात अज्ञात दहशतवाद्यांनी
आज पोलिसांच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला. यात चार पोलिस आणि १२ नागरिक जखमी झाले.
सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना पडकण्यासाठी मोहीम सुरु केली असून, अद्याप
कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं वैद्यकीय आणि
दंतवैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा -
नीटचा निकाल आज जाहीर केला. सी बी एस ई नीट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर
हे निकाल पाहता येतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी नीट २०१८ परिक्षा घेण्यात आली होती. निकालाला स्थगिती देण्याची याचिका
सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्यावर निकाल जाहीर करण्यात आले.
****
पर्यावरणाच्या दृष्टीनं जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी भारत
प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी
म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित राज्यांच्या
पर्यावरण मंत्र्यांच्या संमेलनात ते आज बोलत होते. पर्यावरण सुरक्षा हा भारतीयांसाठी
गंभीर विषय असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचं
यजमानपद भारत भूषवणार असून, प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणं, ही यंदाची
या दिनाची सकंल्पना आहे. यानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा
झालेला पराभव ही लहान गोष्ट नसून, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मुंबई इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पालघर
लोकसभा पोटनिवडणुकीत जरी भाजपला विजय मिळाला, तरीही भाजप विरोधी मतंही तितकीच पडली
असल्याचं पवार म्हणाले. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण तयार असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
राज्यात उद्योग स्नेही धोरण राबवण्यात येत असून, याचा
फायदा लघु-मध्यम उद्योजकांना होत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं
आहे. मुंबई इथं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये आज दोनशे पन्नासाव्या एस एम ई
कंपनीचं लिस्टींग करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लघू आणि मध्यम उद्योगांनी
आतापर्यंत सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचं भांडवल उभं केलं, ज्याचं व्यावसायिक
मुल्य २१ हजार कोटी रुपये एवढे आहे. उद्योग वाढीसह यातून मोठ्या प्रमाणात
बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले. लघु-मध्यम
उद्योगांनी त्यांच्या व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा स्टॉक एक्स्चेंज मध्ये लिस्टींग करून भांडवल उभारण्यावर भर द्यावा,
असं ते म्हणाले.
****
पालघर जिल्ह्यातल्या तारापूर
अणुऊर्जा प्रकल्पात नोकरीतून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलल्याच्या निषेधार्थ
आज सकाळ पासून स्थानिकांनी सुरु केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. नवनिर्वाचित खासदार
राजेंद्र गावित आणि प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे
घेण्यात आलं. उद्या खासदार गावित, प्रकल्पाचे अधिकारी आणि स्थानिक तरूणांच्या समितीची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
****
गेल्या एक तारखेपासून शेतकऱ्यांचा संप सुरु असून, आज औरंगाबाद
- पुणे मार्गावर कायगाव टोका इथं गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी दोन तास चक्का
जाम आंदोलन केलं. यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला दीडपट
हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु असून, मागण्या मान्य नाही झाल्या, तर
येत्या सात तारखेला औरंगाबाद शहराकडे जाणारी रसद बंद करु, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी
दिला.
//*********//
No comments:
Post a Comment