Wednesday, 6 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 6 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांची थकित देणी देता यावीत, यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं साखर कारखान्यांसाठी एका पॅकेजला मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीस लाख टन साखरेचा बफर स्टॉक बनवला जाणार असून, यासाठी साखर कारखान्यांना एक हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्यात येतील, असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं. इथॅनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, कमी व्याजदरानं कर्जं उपलब्ध करून देण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊस उत्पादकांना त्यांचे थकित पैसे मिळावेत यासाठी मागच्या महिन्यात सरकारनं सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली होती.

देशभरातल्या सुमारे तीन लाख सात हजार ग्रामीण टपाल सेवकांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सरासरी छप्पन्न टक्के वाढ करण्याचा निर्णयही आजच्या या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

****

चालू आर्थिक वर्षातलं दुसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना, भारतीय रिझर्व्ह बँकेनं, रेपो दरामध्ये पाव टक्क्याची वाढ केल्यामुळे हा दर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के, इतका झाला आहे, तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्के इतका झाला आहे. जानेवारी २०१४ पासून प्रथमच रिझर्व्ह बँकेनं या व्याजदरात वाढ केली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के इतका राहण्याचा, तर महागाई दर चार पूर्णांक आठ ते चार पूर्णांक नऊ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे.

****

शेतकरी कर्जमाफीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यापासून काही कारणानं अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता येत्या १५ तारखेपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेसाठीची मुदत याआधीच ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षानं हाती घेतलेल्या जनसंपर्क अभियाना अंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आले आहेत. त्यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित, तसंच उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. शाह हे आज लता मंगेशकर यांचीही भेट घेणार होते,मात्र लता मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शाह यांनी ही भेट पुढे ढकलली.

****

राज्य सरकारनं या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणक्रमांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या शासकीय वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधल्या एक टक्का जागा अनाथ विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अनाथालयांमध्ये राहणारे,किंवा ज्यांच्या पालकांची आणि जातीची काहीही माहिती नाही, असे विद्यार्थी या आरक्षणासाठी पात्र ठरतील.

****

निवृत्त जिल्हा न्यायाधीश ईक्बाल बोहरी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आज पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

****

पुण्याच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्राचार्यांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग, सीबीआयनं गुन्हा नोंदवला आहे. प्राध्यापकांच्या नियुक्तींमध्ये कथित घोटाळ्याच्या आरोपावरून हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीनं आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती खासदार संभाजी राजे, छत्रपती शहाजी राजे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते. सकाळी शाहिरी काय॓क़मानंतर शिवरायांच्या पालखीचं राजसदरेवर आगमन झाले. तिथे छत्रपतींच्या हस्ते उत्सवमूर्तीचं पूजन करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मेघडंबरीतल्या मूर्तीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णाभिषेक करण्यात येऊन, शिवरायांच्या प्रतिमेची पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली.
****

No comments:

Post a Comment