Friday, 8 June 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 08.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 8 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०१ दुपारी १.०० वा.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक ४१ टक्के लागला आहे. यंदाही परिक्षेत मुलींनी बाजी मारल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६ टक्के आहे. औरंगाबाद ८८ पूर्णांक ८१, लातूर आणि अमरावती सरासरी ८६, कोल्हापूर ९३ पूर्णांक ८८ टक्के, पुणे ९२ पूर्णांक शून्य आठ, मुंबई ९० पूर्णांक ४१, तर नागपूर विभागाचा निकाल ८५ पूर्णांक ९७ टक्के इतका लागला आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपाला नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. लातूर जिल्ह्यात या संपाला ८५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची व्यवस्था केल्याचं विभागीय वाहतूक अधिकारी ए पी देशमुख यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून, अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे. दरम्यान, एस टी कामगार सेना या संपात सहभागी नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातल्या ११ डेपोतून सकाळपासून एकही गाडी बाहेर पडली नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. शासनानं या पूर्वी संघटनेला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आल्याचं संपकरी संघटनेचे विभागीय सचिव अशोक गावडे यांनी सांगितलं.

****

राज्यात आज अनेक ठिकाणी सकाळपासून पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. शेतकरी हळद, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात करत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत करण्यात आलेली जलसंधारणाची तळी भरत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. उमरगा तालुक्यात काल रात्री १२ वाजेपासून दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर तुळजापूरमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून संततधार सुरु असून, वसमत - कौठा - करुंदा रस्त्यावरच्या तोंडपुसी ओढा पुलावरुन तीन फुट पाण्याचा प्रवाह सुरु असल्यानं या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

****

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या व्याजावर मिळणारं अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठीची थेट हस्तांतरण योजना या आर्थिक वर्षापासून अंमलात येणार आहे. अल्पमुदतीच्या पीककर्जावर अनुदानासाठी सरकारनं १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका अधिसूचनेद्वारे म्हटलं आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच देशाच्या ईशान्य भागातल्या शेतकऱ्यांसाठी यात स्वतंत्र तरतूद आहे. यात शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सात टक्के दरानं व्याज भरू शकतात, तसंच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याजदर चार टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो.

****

फेसबुकच्या वापरकर्त्यांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यासंबंधी केंद्र सरकारनं फेसबुकला जाब विचारला असून, या सबंधीचा सविस्तर खुलासा या महिन्याच्या २० तारखेपर्यंत मागितला आहे. मोबाईल वा इतर उपकरणांमधली खाजगी माहिती फेसबुकनं भ्रमणध्वनी उत्पादकांना वापरासाठी दिल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं होतं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन स्वागत केलं आहे. वॉशिंग्टन इथं नाणेनिधीच्या प्रवक्त्यांनी वाढती महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, विनिमय दरात घसरण या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेनं उचललेलं हे पाऊल योग्य असल्याचं म्हटलं आहे.

****

गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या योजनेला क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी मंजूरी दिली आहे. यामुळे आता ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या खेळाडूंना २० हजार, विश्वचषक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमधल्या सुवर्ण पदक विजेत्यांना १६ हजार तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना १४ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. आशियाई, पॅराआशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधल्या सुवर्ण पदक विजेत्यांना १४ हजार तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना १२ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. आधीपासून निवृत्ती वेतन मिळत असलेल्या खेळाडूंना एक एप्रिलपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं नवं वेतन मिळेल, असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

//**********//

No comments:

Post a Comment