Thursday, 12 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२    जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 संसदेच्या येत्या अठरा तारखेपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशना मध्ये, राज्यसभेचे सदस्य आता बावीस अनुसूचित भाषांपैकी कोणत्याही भाषेत आपलं म्हणणं मांडू शकणार आहेत. सदनात आता, डोगरी, काश्मीरी, कोकणी, संथाली आणि सिंधी भाषेतल्या वक्तव्याच्या तत्काळ अनुवादाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी दिली. बावीस पैकी बारा भाषांच्या अनुवादाची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे, तर, बोडो, मैथिली, मराठी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांसाठी लोक सभेच्या दुभाषांची मदत घेतली जाते. विचार व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच सर्वात प्रभावी माध्यम असतं, असं नायडू यांनी म्हटलं आहे.

****



 भारतीय रेल्वेचा पर्यटन विभाग येत्या १४ नोव्हेंबर पासून एक विशेष पर्यटन एक्सप्रेस गाडी सुरू करणार आहे. रामायणाशी संबंधित स्थळांचं पर्यटन घडवणाऱ्या या गाडीचं नाव, श्री रामायण एक्सप्रेस, असं असणार आहे. नवी दिल्लीहून सुटणारी ही गाडी, रामाच्या जीवनाशी संबंधित स्थळांचं पर्यटन भाविकांना घडवेल. रामायणाशी संबंधित असलेली श्रीलंकेतली स्थळं पाहण्यासाठी इच्छुक असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वे श्रीलंका भेटीची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.

****



 राज्यात गेल्या वर्षी २ हजार १०० पुलांचं ऑडिट करण्यात आलं असून ज्या भागात धोकादायक पूल आहेत, त्या ठिकाणी तात्काळ नवीन पुलाची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य राजाभाऊ वाजे यांनी इगतपुरी मधल्या अस्वली स्थानकामधल्या ब्रिटीश कालीन पुलाची पुनर्बांधणी करण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****



 लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगर परिषदेच्या सात सदस्यांनी काल राजीनामे दिले, यामध्ये भाजपच्या चार सदस्यांचा समावेश आहे. प्रभागातली प्रलंबित कामं आणी नगराध्यक्षांच्या पतीच्या मनमानी तसंच अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ राजीनामे देत असल्याचं, या सदस्यांकडून सांगण्यात आलं

*****

***

No comments:

Post a Comment