Saturday, 14 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून दोन दिवसीय पूर्व उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत, ते आझमगड मध्ये महत्वकांक्षी अशा ३०४ किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल द्रुतगती रेल्वे प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण करण्याबरोबरच इतर विकासकामांचं उद्घाटनही करणार आहेत. नंतर ते वाराणसी शहर गॅस वितरण प्रकल्पाचं लोकार्पण, वाराणसी-बलिया रेल्वे सेवेची सुरूवात, तसंच स्मार्ट सिटी अभियान आणि नमामि गंगे अभियाना अंतर्गत अनेक विकास कामांचं देखील उद्घाटन करणार असून, सभेला संबोधित करणार आहेत. 

****



 अमेरिकेनं रशियावर घातलेल्या संरक्षण विषयक व्यवहारावरच्या बंदी नंतरही भारत आणि रशिया दरम्यानच्या एस - फोर हंड्रेड ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्र खरेदीचा व्यवहार होणार असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. अमेरिकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचीबद्दल विचारलं असता, सीतारामन यांनी, हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा कायदा नसून, भारतानं अगोदरच अमेरिकेला आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगितलं. या व्यवहारा बाबतची भारत आणि रशिया दरम्यानची बोलणी पूर्ण झाली असल्याचं त्या म्हणाल्या.

****



 देशातल्या तुरुंगामंध्ये सुविधांचा अभाव असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे खटल्यांचा निकाल लागण्यास उशीर होत असून, कैद्यांना विनाकारण बराच काळ तुरुंगात रहावं लागत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्ष ते खालच्या पीठानं यासंर्भात महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांना न्यायालयाची मदत करण्यास सांगितलं आहे. हरियाणाच्या फरीदाबाद इथल्या तुरुंगामंध्ये सुविधांचा अभाव असल्याचं वृत्त गांभीर्यानं घेत, देशभरातल्या तुरुंगांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत: याप्रकरणाची व्याप्ती वाढवली आहे.

****



 पाकिस्तान मध्ये २५ जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, दोन वेगवेगळ्या राजकीय सभांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १३३ लोक ठार, तर २०० जण जखमी झाले. बलुचिस्तान मध्ये काल आवामी लीग पक्षाच्या सभेत दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात १२८ लोक ठार झाले. तर खैबर-पख्तूनख्वॉ मध्ये झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.



 दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी आणि त्यांची राजकीय वारसदार मरियम यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

****



 मध्य प्रदेशमधल्या व्यापम घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्या खाली, संशयित सूत्रधार डॉ. जगदीश सागर, परीक्षा मंडळाचे दोन अधिकारी आणि इतरांविरूद्ध हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली. इंदूरमध्ये आर्थिक गैरव्यवहार विरोधी विशेष न्यायालयात, दोन हजार पाचशे पाच पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

****



 आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज लोणंद इथला मुक्काम आटोपून तरड़गाव कड़े प्रस्थान करणार आहे. तरड़गाव कड़े जात असताना प्रथे प्रमाणे पालखीचं  पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं होणार आहे.



देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून निघाली असून, पालखीचा मुक्काम आज सणसर इथं असेल.



 पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज खर्ड्याचा मुक्काम आटोपून आंतरवालीमार्गे दांडेगाव इथं मुक्कामी पोहोचणार आहे.

****



 राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा विशेष दूध प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हयातून शेगाव तालुक्यातल्या १५ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसंच वैरण विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन आणि अनुदान देणं, ग्राम पातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं, रोगप्रतिबंधक लसीकरण करणं अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

****



 बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा उपान्त्य फेरीचा सामना आज भारताची पी व्ही सिंधू आणि इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग यांच्यात होणार आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूनं मलेशियाच्या सोनिया चीहचा २१-१७, २१-१३ असा सरळ दोन सेटस्‌मध्ये पराभव केला.

****



 भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुरुवारी झालेला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.

*****

***

No comments:

Post a Comment