Monday, 16 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६  जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या उद्देशानं संयुक्त रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. संसद भवनात, राज्यसभेतले विरोधी नेते गुलाम नबी आझाद यांच्या कक्षात ही बैठक होणार आहे. बुधवार पासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत असून, ते १० ऑगस्ट पर्यंत चालेल. यात कामकाजाचे एकूण १८ दिवस असतील.

****



 भारत आता जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या आशिया पॅसिफीक विभागाचं नेतृत्व करणार आहे. आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमात आशिया पॅसिफीक विभागातल्या 33 देशांचे प्रतिनिधी, देशाच्या विविध बंदरांवर कार्यरत असणारे सीमाशुल्क अधिकारी सहभागी होणार असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभाग तसंच सीआयआय यांनी केलं आहे. जागतिक सीमाशुल्क संघटनेत जगभरातले १८२ सीमाशुल्क प्रशासक सहभागी आहेत.

****



 दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्री पासून दूध बंद आंदोलन सुरु केलं आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर इथं या आंदोलनाला सुरुवात केली.



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात हडसपिंपळगाव इथं नवले दूध कंपनीचा ट्रक अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकण्यात आल्या. सिल्लोड, वैजापूर, पैठण मध्येही आंदोलन सुरु असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता विजय भांडे यांनी  दिली आहे. दूध दरवाढ झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.



 उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीला दूधाचा अभिषेक करुन हे आंदोलन सुरु झालं. दूधाला पाच रुपये प्रती लिटर दरवाढ मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाची भुरभुर सुरु आहे.



 नाशिक शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

*****

***

No comments:

Post a Comment