Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 14 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकांउटसला महिलांमध्ये आर्थिक जनजागृती करण्याचं
आवाहन केलं आहे. नवी दिल्लीमध्ये या संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते आज बोलत होते. महिलांमध्ये आर्थिक जनजागृती झाल्यास समाजामध्ये बदल घडून येऊ शकतो,
अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
****
बढतीमधील
आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकार नवे विधेयक आणण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये माध्यमांशी
बोलत होते. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात येईल, असे संकेतही त्यांनी
यावेळी दिले. तसंच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदींचं
रक्षण करण्यासाठी सरकार अध्यादेश काढण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा सरकार
विचार करत असल्याचंही ते म्हणाले.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली
आहे. यात शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय
नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा,
सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा आणि प्रसिद्ध वकील के परासरन यांचा कार्यकाळ संपल्यानं
सदनाच्या चार जागा रिक्त झाल्या होत्या.
****
नाणार
प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं
आहे. पुणे इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. समृद्धी महामार्ग आणि नाणार प्रकल्पाचा
मुद्दा वेगळा असून, हा प्रकल्प होणार नसल्याबाबत ठाम असल्याचं ते म्हणाले. सरकारनं
गेल्या वर्षी जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसून, शेतकऱ्यांची
दिशाभूल केल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २९ जुलैला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेत आज साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. उघड्यावरील
मांस तथा खाद्य विक्री बंद करणं, शहरातल्या दवाखान्यांमध्ये साथीच्या रूग्णांना मोफत
सेवा देणं, रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीनं नियंत्रण कक्ष
उघडणं यासह विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयातला परिसर आणि सभागृहाच्या सुशोभीकरणाचं उद्घाटन आज विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी
उदय चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी बागडे यांनी कार्यालयातल्या सभागृहाच्या नुतनीकरण
कामाची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाचा दर्जा
सुधारण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी केल्या.
****
औरंगाबाद इथं आज जगन्नाथ रथयात्रेला नुकताच प्रारंभ झाला आहे. सिडको
परिसरातल्या जगन्नाथ मंदिरातून ही यात्रा सुरू झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती ठेवलेला, फुलांनी
सुशोभित रथ ओढण्यासाठी, भाविकांनी गर्दी केली आहे.
****
राज्यात
आज अनेक भागात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण
असून, दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जालना शहरासह बदनापूर, परतूर,
मंठा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही आज सर्वत्र पावसानं हजेरी लावली. नाशिक,
सातारा, सांगली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरु असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत
आहे.
रत्नागिरी
जिल्ह्यात इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण आज कमी झालं असलं, तरी किनारपट्टीवर जोरदार वादळी
वाऱ्यांमुळे उधाण आलं आहे. अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात दरड कोसळल्यानं दोन दिवसांपूर्वी
बंद पडलेली अणुस्कुरा घाटातली वाहतूक अजूनही सुरू झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भारतीय
बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात
सिंधूनं इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिचा २३ - २१, १६ - २१, २१ - नऊ
असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment