Friday, 13 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 13 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मुंबईत दादर इथल्या इंदू मिल परिसरात होत असलेलं भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं. या स्मारकासाठी साडे बारा एकर जमीन अद्याप हस्तांतरित झालेली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, गजभिये यांचे आरोप फेटाळून लावत, या स्मारकासाठी शंभर टक्के जागा हस्तांतरित झाली असून, स्मारकासाठी आरक्षणही टाकलं असल्याचं सांगितलं.

****

राज्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जास्त कामं मिळावीत, यासाठी त्यांची नोंदणी मर्यादा ५० लाख रुपयांवरुन दीड कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय देण्यासाठी ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंते, ३३ टक्के मजूर संस्था, ३३ टक्के नोंदणीकृत संस्था याप्रमाणे कामं दिली जातील, तसंच हा पॅटर्न नगरविकास विभागातही लागू करण्याबाबत विचार केला जाईल, असं पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यातला एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. आधार कार्डशिवाय कर्जमाफी अर्ज पोर्टलवर सादर करण्याची सुविधा शासनानं उपलब्ध करुन दिली होती, त्यानुसार राज्यातल्या दोन लाख ४० हजार आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या जयभवानी सहकारी साखर कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन दोन महिन्यांत कार्यवाही केली जाईल, असंही देशमुख यांनी सांगितलं. इथल्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली असून, त्याबाबत गृह विभागामार्फत सविस्तर चौकशी सुरू आहे, तसंच कारखान्याकडून त्यांच्या कुटुंबास रक्कम दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राज्यात जुने विद्युत खांब, तार आणि यंत्रणा यांची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही, त्याकरता सात हजार ३०० कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं. यासाठी विभागानं राज्यात २१ हजार अपघात प्रवण क्षेत्र निवडले असून, त्याची देखभाल दुरुस्ती तातडीनं करण्यात येईल, त्यामुळे अपघात होऊन होणारी प्राणहानी, वित्तहानी टाळता येऊ शकेल, असं ते म्हणाले.

****

शिधापत्रिका धारकांना आता तूर डाळ ३५ रुपये प्रति किलो या दरानं मिळणार आहे. आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांकडून हमी भावानं खरेदी केलेल्या तूरीची भरडाई करुन, प्राप्त झालेल्या तूरडाळीची स्वस्त दरानं रास्तभाव दुकानातून विक्री करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच घेतला आहे.

****

समाजात कलह निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सर्व संतांनी समाजात समतेच्या अमृताची पेरणी केली, असं सांगून आठवले यांनी, भिडे यांनी संतांचा अपमान करुन अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं आहे.

****

आषाढी वारीसाठी शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज उस्मानाबाद इथं पोहोचली. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पालखीचं स्वागत केलं. पालखीचा मुक्काम आज उस्मानाबाद इथं असून, उद्या सकाळी पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल. 

****

परभणी जिल्ह्यात पिक विम्यासाठी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी येत्या १७ जुलैला शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी आणि जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना चर्चेसाठी बोलावलं असल्याचं पाटील यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

परभणीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस झाल्यानं पंचगंगासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment