Monday, 6 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 6 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 राज्यघटनेतलं कलम ३५-अ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड सुटीवर असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचं, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितलं. यावरची सुनावणी आता २७ ऑगस्टला होणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये राज्य सरकारला विशेष अधिकार बहाल करणारं हे कलम रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहे. १९५४ मध्ये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या या कलमामुळे जम्मू-कश्मीरच्या अधिवासी नागरिकांना विशेष हक्क प्राप्त झाले असून, लग्न करुन राज्याबाहेर जाणाऱ्या अधिवासी महिलांना मात्र मालमत्तेचा हक्क नाकारण्यात आला आहे.

****



 राज्यसभेत आज सदस्यांनी देशातली लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त केली. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करत भाजपचे अशोक वाजपेयी यांनी, २०२२ पर्यंत भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त होईल, असं सांगितलं. या समस्येचा सामना करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांनी मानवी तस्करीच्या समस्येवर सभागृहाचं लक्ष वेधत, विविध राज्यातल्या तरुण मुलामुलींचं शोषण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

     

 काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली नाही, त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं, ते म्हणाले. मराठा आरक्षण प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.

****



 दुसऱ्या महायुद्धात जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातल्या मृतांना आज लोकसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



 त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत, जळगावचे खासदार नाना पाटील यांनी राज्यातल्या पर्यटनक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष वेधलं, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव उपाययोजना करण्याची गरज त्यांनी नमूद केली.



 औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद इथं गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणारा वेरुळ महोत्सव बंद पडल्याकडे लक्ष वेधलं. ासाठी निधी उपलब्ध करून देत, हा महोत्सव कायमस्वरुपी सुरू करण्याची मागणी खैरे यांनी केली.



 त्यानंतर बिहार मधल्या मुजफ्फरपूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या रंजीत रंजन तसंच राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयकडे देण्यापूर्वी, पुरावे नष्ट केल्याचा आरोप यांनी केला.



या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं होतं.

****



 संशोधन संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेल्या ‘इंप्रिंट - दोन’ या योजनेअंतर्गत ११२ कोटी रूपयांच्या १२२ नव्या संशोधन प्रकल्पांना सरकारनं मंजुरी दिली आहे. ऊर्जा सुरक्षा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमधल्या प्रगत संशोधनाला चालना देण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवली जात असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. एकूण दोन हजारांहून अधिक प्रस्ताव आले होते, त्यातले हे सर्वोत्कृष्ट १२२ संशोधन प्रस्ताव निवडले असून, त्यातल्या ८१ प्रस्तावांना उद्योजकांकडून प्रायोजकत्व मिळालं आहे.

****



 आधार प्राधिकरणाची प्रतिमा लिन करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत, असं आधार प्राधिकरणानं म्हटलं आहे. गूगलच्या एका चुकीवरून अफवा पसरवून जनसामान्यांमध्ये भीती पसरवली जात आहे, असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी ॲन्ड्रॉईड फोनवर आधार प्राधिकरणाचा जुना संपर्क क्रमांक अचानक दिसू लागला होता, मात्र कोणत्याही एजन्सीला हा नंबर मोबाईल फोन्स मध्ये समाविष्ट करण्यास सांगितलं नव्हतं, असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं. पोलीस तसंच अग्निशमन दलाच्या क्रमांकासोबत आधारचा दूरध्वनी क्रमांक चुकून जोडला गेल्याचं गुगलने याआधीच स्पष्ट केलं आहे. याआधारे या फोन क्रमांकावरून मोबाईल फोनमधील डेटा चोरता येऊ शकता नाही, असंही आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.

****



 भारतीय गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लर यानं फिजीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या ‍अँथनी क्वायलला मागे टाकलं, आणि कारकिर्दीतलं दहावं विजेतेपद पटकावलं. भुल्लर आशियाई दौऱ्यातला सर्वोत्कृष्ट भारतीय गोल्फपटू ठरला आहे.

****



 येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं खंड दिला असून, पिकांना वाढीसाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

*****

*** 

No comments:

Post a Comment