Tuesday, 7 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

७ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवस संप पुकारला आहे. राज्य भरातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. यामुळे आज अनेक सरकारी कार्यालयातलं कामकाज ठप्प होण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाली आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतही आज ८०० परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज घाटीत निदर्शनं केली.

 

 राजपत्रित अधिकारी महासंघाच्या दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपात सहभागी होत नसल्याचं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.



 सरकारनं मात्र, संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायदा - मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शासकीय कामकाज थांबवून जनतेची गैरसोय न करता, योग्य मार्गानं आपल्या मागण्या मांडाव्यात, असं शासनानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****



 राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी परवा गुरुवारी नऊ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही घोषणा केली. सदस्यांनी उद्या बुधवार दुपारपर्यंत उमेदवारी प्रस्ताव सादर करावेत, असं त्यांनी सांगितलं. पी.जे.कुरियन गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्यसभेचं उपसभापती पद रिक्त आहे.

****



 माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जयेष्ठ नेते आर.के. धवन यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वीय सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

****



 मराठा आरक्षण आणि राज्यातल्या अन्य प्रश्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. सांगली, जळगाव महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

*****

***

No comments:

Post a Comment