Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
vमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज एकदिवसाचा बंद; औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्यात सर्व शाळांना सुटी जाहीर
vराज्य
सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाला काल दुसऱ्या दिवशीही संमिश्र प्रतिसाद
vराज्यसभेच्या उप सभापती पदासाठी आज निवडणूक होणार
आणि
vवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या “विद्यापीठ
आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी”
उपक्रमाला प्रारंभ
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातल्या काही जिल्ह्यात
आज एकदिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र मुंबई, ठाणे, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये
बंद न पाळता शांततेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
औरंगाबाद
इथं आज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शांततापूर्ण पद्धतीनं
हा बंद करण्यात येणार असल्याचं समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितलं. आरक्षणासाठी
आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अन्यथा, येत्या
पंधरा ऑगस्टपासून ‘एक वेळ चूल बंद‘ आंदोलन
करणार असल्याचं, तसंच राज्यभरातली ठिय्या आंदोलनं साखळी पद्धतीनं सुरूच राहणार
असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ
आज दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात मानवत तहसील कार्यालयावर
काल मोर्चा काढण्यात आला.
बंदच्या
पार्श्वभूमीवर उस्मानाबाद, परभणी, आणि नांदेड जिल्ह्यात काल पोलिसांनी पथसंचलन केलं. अहमदनगर
जिल्हा प्रशासनानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून
कुठल्याही शासकीय किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन
संयोजकांनी केलं आहे.
या बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, परभणी, नांदेड
आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली
आहे.
****
दरम्यान, येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातली सगळी
वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे, त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन
थांबवावं आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी काल केलं.
****
हिंगोली इथं भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या
घरासमोर काल सकल मराठा समाजाच्यावतीनं ठिय्या देऊन भजन आंदोलन करण्यात आलं. तसंच आंदोलकांनी
सरकार आणि आमदारांविरोधात घोषणा दिल्या. आमदार मुटकुळे आंदोलनात सहभागी झाले नाहीत
तसंच आंदोलकांना सामोरे गेले नसल्यानं आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
****
दरम्यान, नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या उंचेगाव इथल्या संदीप शिंदे या युवकानं मराठा आरक्षणासाठी
काल विष प्राशन केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धनगर
समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी औरंगाबादच्या सकल धनगर समाज क्रांती मोर्चाच्या
वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या
समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.
****
राज्य
सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला काल दुसऱ्या दिवशीही राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बहुतांशी
सरकारी कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांअभावी शुकशुकाट होता. संपात सहभागी न झालेले अधिकारी
कार्यालयात बसून होते. औरंगाबादमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या संपामध्ये जिल्ह्यातल्या महसूल कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी, जिल्हा परिषद, आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी
सहभाग घेतला आहे. या संपाला लातूर, धुळे
तसंच जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे. तर, नाशिक इथं समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपात
संपूर्ण सहभाग नोंदवल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, निवृत्तीचं वय साठ वर्षं करण्याच्या संपकऱ्यांच्या मागणीला आपला
तीव्र विरोध असल्याचं महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघानं स्पष्ट केलं आहे. तर संपकाळात शासनाला सहकार्य करण्याचा
निर्णय महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेनं घेतला असल्याचं संघटनेचे राज्य
उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी कळवलं आहे.
****
राज्यसभेच्या उप सभापती पदासाठी आज निवडणूक होणार
आहे. या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे संयुक्तजनता दल चे हरिवंश नारायण सिंह
आणि विरोधी पक्षांतर्फे बी. के. हरिप्रसाद या दोघांनी काल अर्ज भरले. प्रथम प्रस्तावावर
आवाजी मतदान घेण्यात येईल आणि मतविभाजनाची गरज भासल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल.
हरिवंश बिहारमधले ज्येष्ठ पत्रकार असून हरिप्रसाद हे कर्नाटकातले प्रतिनिधी आहेत. प्राध्यापक
पी. के. कुरीयन गेल्या महिन्यात निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त आहे.
****
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या
पार्थिव देहावर काल चेन्नईत मरिना समुद्र किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल
गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी करुणानिधी यांचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
जम्मू
काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचा
पार्थिव देह काल मुंबईत आणण्यात आला. आज भाईंदर इथं त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा जपण्यासाठी नागरिकांनी
प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. कोणत्याही
कार्यक्रमात नेहमीच कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वज वापरावेत, असं याबाबत जारी पत्रकात
म्हटलं आहे. या गोष्टीचं काटेकोर पालन व्हावं यासाठी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित
प्रदेशांनी दक्ष राहण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत.
****
ऑगस्ट क्रांती दिवस आज साजरा होत आहे. १९४२ साली,
याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईत गोवालिया टँक मैदानावरून, इंग्रजांना
भारत छोडो हा इशारा देत, भारतीयांना करो या मरो असं आवाहन केलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या
वतीनं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात “विद्यापीठ आपल्या दारी :
तंत्रज्ञान शेतावरी” हा उपक्रम
राबवण्यात येत आहे. विभागात झालेल्या सुरुवातीच्या
समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे, परंतु
गेल्या पंधरवड्यापासून पावसाच्या खंडामुळे कीडरोगांचा
प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा
परिस्थितीत या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पिक संरक्षणासाठी
शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
****
प्रत्येक नागरिकाला स्वस्त
आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र
सरकारची प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना महत्वाची
भूमिका बजावत आहे. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या
कन्हेरी गावाचे संदीपान झिरमिरे यांनी जनऔषधी परियोजनामुळे उच्च रक्त दाबाच्या औषधांचा
खर्च कमी झाल्याचं सांगितलं, ते म्हणाले..
मी संदीपान रामराव झिरमिरे कन्हेरी तालुका औसा जिल्हा लातूर. पूर्वी बिबिच्या गोळ्यासाठी मी
पहिल्या माझे शे पाचशे रूपये घालत होतो महिन्याकाठी. आता हे जनऔषधी निघाल्या पासून
मला थोडक्या किंमतीमध्ये आपल्या महिन्याच्या गोळ्या मिळतात.
****
आषाढी
वारीनंतर येणाऱ्या एकादशीला, हिंगोली जिल्ह्यात नरसी इथं यात्रा
भरते, परतवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी काल जवळपास तीन लाख भाविक नरसी
गावात दाखल झाले होते. या परतवारीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
या परतवारीला जिल्हाभरातील
लाखोच्या संख्याने भाविक दर्शनासाठी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे दाखल होतात.
परतवारीच्या निमित्ताने तीन लाखांच्या आसपास भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. जिल्हाभरातील
सदुसष्ठ गावाच्या दिंड्या नरसीत रात्रीपासूनच दाखल झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण
परिसर भक्तीमय होऊन विठ्ठल नामाने नामदेव नगरी दुमदुमली होती. जिल्हाभरातील भाविकांनी
जय घोष करीत दिंडीत सहभाग घेतला होता. भाविकांची संख्या लक्षात घेता व दर्शन सुलभ व्हावे
यासाठी सर्वतोपरी खबरदारी नामदेव संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली होती.
--- रमेश कदम
आकाशवाणी वार्ताहर हिंगोली.
****
भारतीय
जनता पक्षाच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी
मराठा क्रांती मोर्चाचे धुळ्याचे मुख्य समन्वयक मनोज मोरे यांच्यासह १७ जण स्वतःहून
पोलिस ठाण्यात हजर झाले, त्यांना अटक करण्यात आली आहे.
****
पावसानं महिनाभरापासून
उघडीप घेतल्यानं शेतकरी चिंतेत असून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल
वैजापूर तालुक्यात मनोली, जिरी आणि बळेगावातील शेतकऱ्यांशी
भेटून संवाद साधला. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली असून मका
पिकांचही नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी क्रिकेट
मालिकेतला दुसरा सामना आज लॉर्डस इथं खेळला जाणार आहे. या मालिकेतला बर्मिंगहॅम इथं
झालेला पहिला सामना भारतानं गमावल्यानं हा सामना जिंकून बरोबरी करण्याचा भारतीय संघाचा
प्रयत्न असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामना सुरु होईल.
****
भारतीय टपाल विभागाच्या बँकेच्या साडे सहाशे शाखांचं
उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २१ तारखेला होणार आहे. केंद्रीय
दूरसंवाद राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली.
देशभरात एकाच वेळी कार्यान्वित होणाऱ्या शाखांमुळे बँकिंग क्षेत्राला बळकटी येईल असं
ते म्हणाले. टपाल विभागाची एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयं, तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण
डाक सेवकांमुळे या बँकेचा कार्यविस्तार वेगानं होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
*****
***
No comments:
Post a Comment