▼

Saturday, 18 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १८ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयम यांच्या सोबत उच्चस्तरिय बैठक घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. केरळमधली पूरपरिस्थिती अजूनही गंभीर असून अलप्पुझा जिल्ह्यात हजारो लोकं पुरात अडकली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर चेन गन्नुर आणि चलक्कुडी जिल्ह्यातही अजूनही परिस्थिती गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे या जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या आपत्तीमधल्या मृतांच्या नातेवाईकास प्रत्येकी दोन लाख, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

****



 दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अन्टानियो गुटेरस यांनी केरळ मधली पूर परिस्थिती आणि त्यानंतर झालेलं प्रचंड नुकसान तसंच हजारो लोक विस्थापित झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. केरळमध्ये गेल्या शंभर वर्षामधला हा सर्वात मोठा महापूर आहे. सुमारे ८० धरणं त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक भरुन वाहत असून, सुमारे तीनशे जणांचा यामध्ये बळी गेला आहे.

****



 मॉरीशसमध्ये अकराव्या तीन दिवसीय जागतिक हिंदी संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी पोर्ट लुईस मध्ये या संमेलनाचं उद्घाटन केलं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अन्य मंत्री या संमेलनात सहभागी झाले आहेत. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करुन संमेलनाला सुरुवात करण्यात आली. हिंदी विश्व आणि भारतीय संस्कृती हा या संमेलनाचा विषय आहे. हे संमेलन हिंदी भाषेचा वापर आणि जगभरात या भाषेला प्रोत्साहन देण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे.   

****



 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थि उत्तर प्रदेशातल्या विविध नद्यांमध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेश ही वाजपेयी यांची कर्मभूमी होती आणि राज्यातल्या अनेक ठिकाणांशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. राज्य सरकारनं या ठिकाणांची यादी जारी केली आहे. अस्थि विसर्जनाबाबतची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसून, या महिन्याच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 उद्योजक कलानिधी मारन यांनी अवैधरित्या स्थापित केलेल्या दूरध्वनी विनीमय खटल्यामधे त्यांना आरोपमुक्त करण्यासाठीची याचिका सर्चोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे आता कलानिधी मारन यांना आणि इतर आरोपींना याप्रकरणी खटल्याला सामोर जावं लागणार आहे. दयानिधी मारन हे माहिती आणि प्रसारण मंत्री असताना कलानिधी मारन यांनी हे अवैध विनीमय सुरू केल्याचा, तसंच दयानिधी मारन यांनी या प्रकरणी पदाचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  

****



 देशभरात २०१७-१८ या आर्थिक वर्षात १० लाख तीन हजार कोटी रुपये इतक्या विक्रमी प्रत्यक्ष कराचं संकलन झालं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य शबरी भट्टासाली यांनी गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली. केंद्र सरकारनं अर्ध्याहून अधिक महसूल आयकर विभागात जमा केल्याचं त्यांनी सांगितलं. २०१७-१८ या आर्थिक वर्षात सहा कोटी ९२ लाख रुपयांच्या परताव्यासाठी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यात आल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 घरात स्फोटक साहित्य  सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या अटके विरोधात ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात काल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मोर्चा काढला. १० ऑगस्टला  वैभव राऊतच्या घरावर आणि दुकानावर धाडी टाकून दहशतवाद विरोधी पथकानं मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य जप्त करत राऊतला अटक केली होती. काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी काल याविरोधात काढलेल्या मोर्चात दोन हजाराहून अधिक लोक सामील झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****



 नाशिकमधले शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचं काल आजारपणामुळे निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. गेल्या १५ दिसांपासून त्यांच्यावर नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गोडसे यांनी शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर ते परत शिवसेनेत आले होते. आपल्या राजकीय कारकीर्दीवर संसरी ते संसद हे पुस्तक त्यांनी लिहीलं होतं. 

****



 १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबांग इथं सुरुवात होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता या स्पर्धांना सुरुवात होईल. भारतानं ५७२ सदस्यांचं पथक या क्रीडा स्पर्धांसाठी पाठवलं असून, यात ३११ पुरूष तर २६० महिलांचा समावेश आहे. उद्घाटन सोहळ्यात भालाफेक खेळाडू नीरज चोपडा भारताचा ध्वजवाहक असेल.

****


 भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आजपासून नॉटिंगहम इथं सुरु होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरु होईल. मालिकेत भारतानं सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. २० वर्षीय यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा या मालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे.

*****

*** 

No comments:

Post a Comment