▼

Sunday, 19 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.

****

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार क्षेत्रात सीमारेषेवर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव आज उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलाच्या जवानांनी काही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. परंतु, त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक झाली.

दरम्यान, कुपवाडा नियंत्रण रेषेजवळ काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात सेनेच्या एका जवानाला वीरमरण आलं. गुलाब चौकीवर तैनात असणारी राष्ट्रीय दलाची तुकडी गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट झाला.

****

दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचं योग्य मूल्य निर्धारण होण्यासाठी केंद्र सरकार नोंदणीकृत मूल्यनिर्धारकांची तरतूद करणारं नवं विधेयक आणेल, असं केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितलं. दिवाळखोरी संदर्भातले नवे नियम आणि कायदे लागू झाल्यानंतर अशा मूल्यनिर्धारकांची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी हे विधेयक नव्या नियमांचं कायद्यात रुपांतर करेल, अशी अपेक्षा आहे. सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निर्धारकांकडून योग्य ते निर्धारण पुरेशा प्रमाणात होत नाही आणि योग्य निर्धारण हाच दिवाळखोरीतील कळीचा मुद्दा असल्याचं मत कंपनी कारभार सचिव श्रीनिवास यांनी व्यक्त केलं आहे.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आता वेगवान होत असून, तपास यंत्रणांनी या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारास उघड करणं आवश्यक आहे, असं दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी काल औरंगाबाद इथून अटक केलेला कोण आहे आणि कोणत्या विचारसरणीनं त्यानं दाभोलकर यांची हत्या केली, हे समाजासमोर येणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****

श्रावण महिन्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ आणि खुलताबाद इथं येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद कडून खुलताबाद, वेरुळकडे जाणारी सर्व जड वाहनं दौलताबाद टी पॉईंट पासून आनंद धाबा, कसाबखेडा मार्गे कन्नडकडे जातील आणि कन्नड कडून औरंगाबादकडे येणारी सर्व जड वाहनं कसाबखेडा मार्गे आनंद धाबा दौलताबाद टी पॉईंट मार्गे जातील. तसंच श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉईंट पासून वेरूळ पर्यंत आणि फुलंब्रीकडून खुलताबादकडे जाणारी सर्व जड वाहनं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी दिले आहेत. वाहतूक व्यवस्थेतला हा बदल नऊ सप्टेंबरपर्यंत राहील.

****

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे घेण्यात येणारा हेरिटेज वॉक आज ऐतिहासिक पाणचक्कीत पार पडला. इतिहास तज्ज्ञ डॉ.दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी इतिहासप्रेमींना या स्थळाची माहिती आणि स्थापत्यशैलीचं महत्त्व सांगितलं. यावेळी महानगर पालिकेच्या उपायुक्त मंजुषा मुथा यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

जालना जिल्ह्यात पाणी टंचाई असलेल्या १९७ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एकशे सदुसष्ठ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या योजना राबवण्यासाठी एकूण १९० कोटी २८ लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. नवीन आणि सध्या चालू अशा १७५ योजनांसाठी एकूण १९६ कोटी ३७ लाख रूपयांचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आला आहे.

****

राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पैसे मिळण्याच्या कामी मदत म्हणून एका शेतकऱ्याकडून ४० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना वेरूळ इथल्या एका तलाठ्यास काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. नामदेव कुसनुरे असं या तलाठ्याचं नाव असून, त्यानं या जमिनीच्या मोबदल्यासाठी मिळणाऱ्या पैशातला एक टक्का म्हणून या शेतकऱ्याकडे दोन लाख ९६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

****

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २७ ऑगस्टला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयावर ढोल जागर आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र धनगर आरक्षण समन्वय समितीनं काल जालना इथं ही माहिती दिली. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी परभणी इथं धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

****

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत खातं उघडलं असून, नेमबाजीत १० मीटर रायफल मिश्र सांघिक प्रकारात अपूर्वी चंदेला आणि रविकुमारनं कांस्य पदक पटकावलं. आज झालेल्या अंतिम फेरीत या जोडीनं ४२९ पूर्णांक नऊ गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं.   

महिला कबड्डी मध्ये भारतानं जपानचा ४३ - १२ असा पराभव केला. भारतीय पुरुष संघाचा सामना सध्या बांग्लादेशसोबत सुरु आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचा सामना मालदीवसोबत आणि महिला हॉकी संघाचा सामना इंडोनेशियासोबत होणार आहे.

****

भारतानं दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या १५ वर्षांखालील महिला अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशचा पराभव केला. भूतानची राजधानी थिंपू इथं झालेल्या या सामन्यात मध्यंतरानंतर सुनीता मुंडानं केवळ एक गोल करून बांग्लादेशला नमवलं.

****

No comments:

Post a Comment