▼

Saturday, 18 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.08.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी १०० कोटी रुपयांची अतिरिक्त मदतही जाहीर करण्यात आली आहे.

****

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एम सी एच आय-क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचं अन्न उपलब्ध करुन दिलं आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन आणि जितो इंटरनॅशनलकडून प्रत्येकी ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन अन्न उपलब्ध करुन देण्यात आलं असून, त्यापैकी सहा टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.

****

केरळमध्ये आलेल्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. तसंच केंद्र सरकारनं केरळला ५०० कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत ही पुरेशी नसल्याचं मत मुंडे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं.

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारे औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सैय्यद मतीन यांना पोलिसांनी अटक केली आहे. महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत मतीन यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर भाजप नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली. महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही अटक करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे मतीन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

****

मराठवाड्यातल्या प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रकरणांचा निपटारा शासनस्तरावर येत्या १७ सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं जिल्हा सरपंच, पोलीस पाटील संकल्प परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांचं सबलीकरण व्हावं यासाठी सरपंचांनी गावा-गावात मनरेगाच्या कामांवर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी राज्यातल्या प्रत्येक गावात पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, त्यांचा एक प्रतिनिधी विधीमंडळात असावा, तसंच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दरमहा ग्रामसेवकाच्या पगाराइतके सरकारी मानधन आणि निवृत्ती वेतन यासह अन्य मागण्या सरपंच आणि पोलिस पाटील संघटनेच्या वतीनं शासनाकडे करण्यात आल्या.

****

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना आज लातूर इथं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरच्या हनुमान चौकात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाजपेयी यांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी यांचं कार्य पुढे नेणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचं मत भाजपचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी यावेळी व्यक्त केलं.

धुळे शहरातही आज सर्वपक्षीय नेत्यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते.

****

जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि आदीवासी शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहीरीचं खोदकाम करण्यासाठी अडीच लाख रुपये, विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, विद्युत पंप, वीज जोडणीसाठी तीस हजार तर शेततळ्याचं प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. दीड लाखांच्या मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नऊ सप्टेंबरपर्यंत शासनाच्या अग्रीवेल डॉट महा ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असं आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी केलं आहे़

****

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, राधानगरी धरणाचे चार दरवाजे आज सकाळी उघडल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांमध्ये पूर परिस्थिती कायम पण नियंत्रणात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कालच्या मुसळधार पावसानंतर सुरत-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर भराव वाहून गेल्यानं या महामार्गावरील वाहतूक अद्यापही बंद आहे.

****

No comments:

Post a Comment