▼

Sunday, 19 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.08.2018 - Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आता वेगवान होत असून, तपास यंत्रणांनी या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारास उघड करणं आवश्यक आहे, असं दाभोलकर यांचे पूत्र हमिद दाभोलकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी काल औरंगाबाद इथून अटक केलेला कोण आहे आणि कोणत्या विचारसरणीनं त्यानं दाभोलकर यांची हत्या केली, हे समाजासमोर येणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचं नाव सचिन अणदुरे असून, नालासोपारा स्फोटक प्रकरणी तपासासाठी एटीएसनं चार दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, सचिन यानं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली, असं एटीएसकडून सांगण्यात आलं आहे.

****

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा हस्तक असलेला, जबीर मोती याला काल लंडन इथं तिथल्या पोलिसांनी अटक केली. मोती याला अटक करण्याची विनंती भारतानं इग्लंडकडे अनेकदा केली होती. मोती दाऊदची आर्थिक गुंतवणूक बघायचा, तसंच त्यानेच दाऊद आणि त्याच्या पत्नीला इंग्लंडला हलवलं होतं.

****

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्ता भाडे वसुली मोहिमेला काल सुरूवात झाली. या मोहिमेदरम्यान, शहरातल्या गांधी मार्केट या परिसरातल्या नऊ दुकानांना, भाडं न भरल्यामुळे सील करण्यात आलं. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता भाडे न भरणाऱ्यांवर कारवाई करून भाड्यापोटी दहा लाख रुपये वसूल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असून सर्व व्यापाऱ्यांनी मालमत्ताभाडे आणि नागरिकांनी नियमितपणे कर भरण्याचं आवाहन मनपानं केलं आहे.

****

श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण शनिवारनिमित्त मारूतीच्या मुर्तीचा शृंगार साडेतीन लाख बेलपत्रांनी करण्यात आला होता. जिल्ह्यातून अनेक भाविक जय भद्राचा जयघोष करीत शुक्रवारी रात्रीच पायी निघाले होते. या पायी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी चहापाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर भारतानं सहा गडी बाद ३०७ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी १५९ धावांची भागिदारी केली. कोहली ९७ धावांवर बाद झाला. 

****

No comments:

Post a Comment