Tuesday, 7 August 2018

Text - AIR News Bulletins, Aurangabad 07.08.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 7 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ ऑगस्ट २०१ सायंकाळी ६.०० वा.

****

आगामी दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात इतर मागासवर्गीय विकास महामंडळाला ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत ओबीसींच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यातल्या १९ जिल्ह्यांमध्ये नवीन वसतीगृह बांधणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, ओबीसींच्या आरक्षणानुसार त्यांना नोकरी देण्यास शासन कटीबद्ध असल्याचंही नमूद केलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारनं आज न्यायालयात दिली. यासंदर्भात आज सुनावणी घेण्यात आली. यावरची पुढची सुनावणी येत्या १० सप्टेंबरला होणार असून, तेव्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले आहेत. आंदोलन तीव्र होत असून, आत्महत्यासारखे प्रकार घडणं चिंतेची बाब आहे, त्यामुळे राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना न्यायालयानं केली आहे.

****

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज नांदेड शहरात खासदार अशोक चव्हाण, आमदार डी.पी.सावंत आणि आमदार अमर राजूरकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी हे सर्व लोकप्रतिनिधी आंदोलकांसोबत रस्त्यावर बसून होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातही आज आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये नवी मुंबईतला मराठा समाज सहभागी होणार नसल्याचा निर्णय नवी मुंबई सकल मराठा समिती आणि माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.

****

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवस संप पुकारला असून, एकूण १७ लाख कर्मचारी संपवार गेले आहेत. लातूर जिल्ह्यात या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचं कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बी बी गायकवाड यांनी सांगितलं. उस्मानाबाद तसंच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, यामुळे कामकाज आज ठप्प आहे. जालना, हिंगोली, सातारा, सोलापूर, धुळेसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यातले कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

****

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त भागीदारी धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. याअंतर्गत मालकीची जमीन असल्यास खाजगी व्यक्ती म्हाडाशी भागीदारी करू शकेल, आर्थिक दुर्बल, अल्प उत्पन्न गटातल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ ही कंपनी स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या माध्यमातून बांबू उद्योगास चालना मिळेल आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

****

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. ‘पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे यांना जाहीर झाला आहे. ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ बाबाराव मुसळे, तर ‘विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार’ महेश लोंढे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी ही घोषणा केली.

****

मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफराबाद इथल्या तहसील कार्यालयासमोर शेळी, मेंढ्यांसह आंदोलन करण्यात आलं. अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री इथं सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

****

कुमार अवस्थेतल्या मुलींच्या आरोग्यविषयक अडचणी तसंच मासिक पाळीबाबत समुपदेशन करण्यासाठी जालना जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ग्रामीण जीवननोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अकरा हजार विद्यार्थिनींना आज ‘अस्मिता माझा गौरव, माझा हक्क’ स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. हे स्मार्ट कार्ड असणाऱ्या मुलींना बचत गटाच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment