आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
आज आंतरराष्ट्रीय
ज्येष्ठ नागरिक दिवस आहे. वृद्धजनांच्या मानवाधिकारांना आणि मूलभूत स्वातंत्र्याला
प्रोत्साहन देण्याबाबतची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी एक ऑक्टोबरला हा दिवस
साजरा केला जातो. या वर्षी या दिवसाचं घोषवाक्य आहे, ‘मानवाधिकारांचे अग्रदूत वृद्धजन‘.
या दिनानिमित्त
बीडच्या गोपिका ज्येष्ठ नागरिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
डॉक्टर द्वारकादास लोहिया, यांना जाहीर झाला आहे.
या दिनानिमित्त
आज औरंगाबाद शहरात भारतीय स्टेट बँकेच्या शहागंज शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची
माहिती शाखेचे मुख्य प्रबंधक दीनबंधू रॉय यांनी दिली आहे.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या आज असलेल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री
राजनाथ सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती समाजातल्या प्रत्येक वर्गाशी
घनिष्ठतेनं जोडलेले आहेत आणि त्यांच्या ज्ञानामुळे भारताला लाभ होत आहे, असं पंतप्रधानांनी
आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
उझबेकिस्तानचे
राष्ट्रपती शौकत मिरजियोयेह यांचं दोन दिवसांच्या
भारत भेटीसाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. आज राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत
करण्यात आलं .ते आज भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार
आहेत.
****
संयुक्त राष्ट्रसंघाचे
सरचिटणीस अँटेनिओ गुटेरस हे चार दिवसांच्या
दौऱ्यासाठी आज भारतात येत आहेत. ते उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात
होणार असलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे मध्ये सहभागी होतील. आपल्या
या भारत भेटीत गुटेरस, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार असून, परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज यांच्या सोबत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत.
****
पंजाब नॅशनल
बँक आर्थिक घोटाळा प्रकरणासंदर्भात सक्त वसुली संचालनालयानं फरार हिरे व्यापारी नीरव
मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीची, भारतासह इतर चार देशातली, सहाशे सदोतीस
कोटी रुपये मूल्याची संपत्ती जप्त केली असल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****
प्रख्यात
चित्रपट अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं आज सकाळी मुंबईत वृद्धापकाळामुळे
निधन झालं. त्या सत्त्याऐंशी वर्षांच्या होत्या.
*****
***
No comments:
Post a Comment