Thursday, 13 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 आज गणेश चतुर्थी. गणरायाच्या आगमनानं आजपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. महाराष्ट्राबरोबरच तामीळनाडू-कर्नाटक, गुजरात आणि इतर काही राज्यांमधे हा उत्सव साजरा केला जातो. आज ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. पर्यावरणपुरक गणेश मूर्तीला यंदाही प्रोत्साहन मिळालं असून, शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 दरम्यान, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग आज गणेश चतुर्थी निमित्त बंद राहणार असल्याचं या महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी कळवलं आहे.

*****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांची भेट घेतली. विराट हिंदूस्थान संगम संस्थेकडून आयोजीत भारत-श्रीलंका संबंध-पुढची वाटचालया विषयावर व्याख्यान देण्यासाठी राजपक्षे नवी दिल्ली इथं आले आहेत.

*****



 बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेलेला फरार उद्योजक विजय माल्या याचं भारताला प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या याचिकेवर ब्रिटनमधलं न्यायालय १० डिसेंबरला निकाल देणार आहे. या प्रकरणी ब्रिटनमधल्या वेस्टमिनीस्टर दंडाधिकारी न्यायालयात काल अंतिम वाद - प्रतिवाद झाला. यावेळी न्यायालयानं विजय माल्या याच्यासाठी आर्थर रोड कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोठडीचंही परीक्षण केलं. याचिकेत नमूद असलेलं प्रकरण महत्त्वाचं असून, कारागृहाची स्थिती हा दुय्यम मुद्दा असल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी सुनावणी करताना नोंदवलं.

****



 अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फरार उद्योगपती विजय माल्ल्याची भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. २०१४ पासूनं आपण मल्ल्याला कधीच भेटलो नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे. तडजोडीच्या प्रस्तावासह अर्थमंत्री आणि मल्ल्या यांच्यात लंडन इथं झालेल्या भेटीबद्दल माल्ल्यानं प्रसारमाध्यमांना जी माहिती दिली त्यासंदर्भात जेटली बोलत होते.

*****



 टोकयोत सुरू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिंपिक पदक विजेती पी. वी. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह सात भारतीय खेळाडू उपउपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आज सामने खेळतील. तिसरं मानांकन प्राप्त सिंधू चीनच्या फ्रैंगजी गाओविरुद्ध झुंज देईल. पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत किदंबी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या विंग की विंसेंट विरुद्ध तर एच. एस. प्रणॉयचा सामना इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका विरुद्ध होणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment