Saturday, 15 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****

§  स्वच्छता ही सेवा या अभियानाला आजपासून देशभरात सुरूवात

§  गणपती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणारा डीजे लावल्याबद्दल लातूर इथं गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल; डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास उच्च न्यायालयाची बंदी कायम

§  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निर्मलदादा ग्यानाणी यांचं निधन

आणि

§  ‘अशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत प्रारंभ

****



 स्वच्छता ही सेवा या देशव्‍यापी अभियानाचा आजपासून शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी नवी दिल्‍लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून या पंधरा दिवसाच्या अभियानाचं उदघाटन करतील. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाचा उद्देश्‍य  राष्‍ट्रपिता महात्मा गांधी याचं स्‍वच्‍छ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे आणि लोक चळवळीला प्रोत्साहन देणं हा आहे. पंतप्रधान मोदी देशातल्या अठरा ठिकाणच्या लोकांशी यावेळी चर्चा करणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी, सैनिक, आध्‍यात्मिक नेते, दुग्‍ध आणि कृषी सहकार संघांचे सदस्य, पत्रकार, स्थानिक प्रशासनातले अधिकारी, रेल्वे कर्मचारी स्‍वयं-सहायता गट  आदींचा समावेश आहे.



 तत्पूर्वी, काल आपल्या ट्विटरवरच्या व्हिडीओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी ही चळवळ, महात्‍मा गांधी यांना श्रद्धांजलि अर्पित करण्याचं योग्य माध्यम असल्याचं सांगितलं. लोकांनी या चळवळीत सहभागी होऊन ‘स्‍वच्‍छ भारता’साठीच्या प्रयत्नांना मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.



  या अभियानानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 कुष्ठ रुग्णांच्या पुनर्वसनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र तसंच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत. या रुग्णांना आरक्षण तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार पुरेशी पावलं उचलत नसल्याची तक्रार एका याचिकेतून करण्यात आली आहे, या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं काल हे निर्देश दिले. पूर्णपणे बरा होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनासंदर्भात उदासीन दृष्टीकोनाबद्दल, न्यायालयानं नापसंती व्यक्त केली.

****



 अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत, नॅब या राष्ट्रीय दृष्टीहीन संघटनेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. नॅबच्या वतीनं काल मुंबईत आयोजित ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी, नॅबनं पुढाकार घ्यावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली.

****



 देशभरात काल हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध साहित्यिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  राजभाषा कीर्ती आणि गौरव पुरस्कार प्रदान केले. इंग्रजीच्या प्रभावातून दूर होऊन, राजभाषा हिंदीला प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं.  शासकीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी इंग्रजीचा अट्टहास सोडून, जनसामान्यांच्या भाषेत संवाद साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी केलेल्या भाषणात, हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असल्याचं नमूद केलं.

****



 लातूर इथं गणपती आगमनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणारा डीजे लावल्याबद्दल राजा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉल्बी, अन्य साहित्य आणि टेम्पो असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं.  कोल्हापूर इथंही आगमनावेळी सार्वजनिक ध्वनिप्रदूषण कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मंडळांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यातून डॉल्बी सिस्टीम, ट्रॅक्टर, ट्रॉली असा सुमारे ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच  विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं  आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला आहे. ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र याविषयी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथल्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. येत्या २१ सप्टेंबरपर्यंत नायडू यांना अटक करून, न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश, न्यायालयानं पोलिस प्रशासनाला दिले आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी २०१० मध्ये आंध्रप्रदेश विधानसभेतले विरोधी पक्षनेते असलेले नायडू यांनी, महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश सीमेवर नांदेड जिल्ह्यातल्या बाभळी बंधाऱ्यावर आंदोलन केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलं आहे.

****



 केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सहकार चळवळ संपवून मुठभर भांडवलशहांना मोठं करायच आहे. असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं  केला. रेणा सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन २५०० रुपये  ऊस दर दिल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक  दिलीपराव देशमुख यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोयाबीन, तूर, कापूस आणि दुधाला योग्य भाव मिळत नाही असं सांगून शेतकऱ्यांना संपावर  जाण्यास भाग पाडणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून  देण्याची वेळ आली आहे असं पाटील यांनी पुढं नमूद केलं

****



 केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या नऊ आणि २२ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांची नोंदणी, आरोग्य तपासणी, आणि विविध चाचण्या केल्या जात आहेत. या योजनेच्या लाभार्थी शितल देशमुख आपला अनुभव सांगतांना म्हणाल्या --- 

माझ नाव शितल सुदीप देशमुख. राहणार पोहनेर. आठ आठवड्याच्यानंतर मी आशा ताईकडे गेले. त्यांनी मला हॉस्पीटल मध्ये आणून माझं रजिस्ट्रशन केले. व मला सर्व माहिती सांगितली. प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला चेकींग केल जात. सिस्टर आणि डॉक्टर  स्वतः चेक करतात, गोळ्या औषध देतात. एच.बी.चेकींग, वजन हे सर्व चेकिंग करतात. रोज चौरस आहारा बद्दल माहिती सांगितली जाते. त्यामध्ये पालेभाज्या, कडधान्य खायला सांगितलं जात. रक्त वाढवण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. डिलेव्हरी बद्दल माहिती सांगितली जाते.



****



 उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कार्यालयातल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काल निलंबित करण्यात आलं. महिलेनं तक्रार नोंदवल्यानंतर  जगताप यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर जगताप यांना अटक करण्यात आली. न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यामुळे शासनानं त्यांना निलंबित केलं आहे.

****



 जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निर्मलदादा ठाकुरदास ग्यानाणी यांचं काल रात्री औरंगाबाद इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शहरातल्या मुकुल मंदिर शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कराची इथं जन्मलेले निर्मलदादा फाळणीच्या काळात भारतात स्थलांतरीत झाले. १९७१ मध्ये स्काउट गाइडच्या चळवळीनिमित्त ते मराठवाड्यात आले. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा स्काउट जीवन गौरव आणि भारतीय शिक्षण मंडळ  मुंबई यांच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आज सकाळी ८ ते ९ या वेळेत त्यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुकुल मंदिर शाळेच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. त्यांनी मरणोत्तर देहदान केलं आहे.

****



 ‘अशिया चषक अजिंक्यपद या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत प्रारंभ होत आहे. भारतासह पाकिस्तान,  श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात आज उदघाटनाचा सामना होईल. भारताचा पहिला सामना येत्या मंगळवारी हाँगकाँगसोबत  होणार आहे.

****



 प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेतंर्गत यावर्षी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी  नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना १९ कोटी ५४ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याचा लाभ सात हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असं नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी म्हटल आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत  ते बोलत होते.

****



 नाशिक-  मुंबई रेल्वे मार्गावर काल कसाराजवळ, रेल्वेची रुळ देखभाल दुरुस्ती गाडी घसरल्यामुळे, या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती. यामुळे जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडपर्यंतच गेली तर तपोवन एक्सप्रेस पुणे मार्ग नांदेडला आली. 



 दरम्यान, धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. तर हैद्राबाद रेल्वे स्थानक इथं सिग्नल दुरूस्तीच्या कामानिमित्त ट्रफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे आज पूर्णा-हैद्राबाद, हैद्राबाद-औरंगाबाद आणि हैद्राबाद – परभणी या प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment