Sunday, 16 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्त्रो आज व्यावसायिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी42 हे यान श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे. आज रात्री 10 वाजून सात मिनिटांनी होणारं हे प्रक्षेपण पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचं इस्त्रोच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. नोव्हा एस ए आर आणि इंग्लंडच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एस वन-फोर या भू निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांना वाहून नेणारे इस्त्रोचे पीएसएलव्ही-सी42 हे यान श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावर उड्डाणासाठी तयार आहे.

****

 माजी पेट्रोलीयम मंत्री सत्यप्रकाश मालविय यांचं दिल्लीमध्ये एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियममंत्री होते. उद्या सकाळी अकरा वाजता अलाहाबाद इथं त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

****

 भारतीय पर्यटन विभागाच्या पर्यटन पर्व या उपक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत आज सकाळी औरंगाबाद इथं रंगीन दरवाजा आणि किले अर्क परिसरात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातले प्रसिद्ध ५२ दरवाजे आणि किलेअर्क विषयी पर्यटनप्रेमींना माहिती देण्यात आली. उद्या सकाळी आठ वाजता बीबी का मकबरा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पर्यटन पर्व हा १२ दिवसांचा उपक्रम असून या दरम्यान अनेकविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. मराठवाड्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे.

****



 राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता विश्रामगृहावर ते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी स्वातंत्र्य सैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांनतर राज्यपाल गणपती नेत्र रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारनंतर भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करणार आहेत.

****

 पाऊस नसल्यामुळे वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार त्र्यंबक भिसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामात सुरुवातीत चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मूग, गहू, उडीद, तुर, सोयाबीन इत्यादी पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र पावसानं उघडीप दिल्यानं ही सर्व पिके वाळून गेली आहेत, या पार्श्वभूमीवर या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

 मराठवाड्यात काही भागात काल पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद इथं रात्री उशीरा पाऊस झाला, सुमारे तीन आठवड्यांच्या खंडानंतर होत असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



औरंगाबाद जिल्ह्यातही वैजापूर, गंगापूर भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

****



 डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेच्या, जागतिक गटाच्या प्ले ऑफ लढतीत, भारताचा काल सर्बियाकडून 3-0 असा पराभव झाला. सर्बियात क्रालजेवो इथं झालेल्या या दुहेरीच्या सामन्यात सर्बियाच्या निकोल मिलोजेविक-डॅनिलो पेट्रोविक या जोडीनं भारताच्या रोहन बोपण्णा-साकेत मायनेनी जोडीला 7-6, 6-2, 7-6 असं चुरशीच्या लढतीत हरवलं.  या पराभवामुळे डेव्हीस चषक स्पर्धेत, भारताला पुन्हा पात्रता फेरीसाठी आशिया ओशिनिया गटात खेळावं लागणार आहे.

****

 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं पाकिस्तान आणि हाँगकाँग दरम्यान सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध बुधवारी सामना खेळेल. काल बांग्लादेश आणि श्रीलंका यादोन संघात झालेल्या सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं श्रीलंकेचा १३७ धावांनी पराभव केला.

*****

*** 

No comments:

Post a Comment