Monday, 17 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 एक्काहत्तराव्या मराठवाडा मुक्ती दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झालं. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. पोलिस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

 स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आपण मराठवाड्याला समृद्धी मिळवून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, जिल्ह्यातले सर्व आमदार, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.

 विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या ‘ अग्रेसर मराठवाडा‘ या पुस्तकाचं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालय ते क्रांती चौक मार्गावर ११११ फुट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

या दिनानिमित्त नांदेड इथं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तर जालन्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.   

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं शालेय विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. पंतप्रधान उद्या वाराणसी मध्ये विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत.

****

 जम्मूमध्ये भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर अद्ययावत कुंपण अर्थात स्मार्ट फेन्सिंग घालण्याच्या प्रकल्पाची आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर सुरुवात होणार आहे. सर्वंकष एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून सीमा सुरक्षा दलानं हा प्रकल्प हाती घेतला असून, या कुंपणामुळं भारतात घुसखोरी अशक्य होणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment