Monday, 17 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. मराठवाड्यात सर्वत्र या दिवसानिमित्त ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.या दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा औरंगाबाद इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.   

राज्य सरकार मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना दिली. राज्य सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी विविध उपाय योजत असल्याचं त्यांनी सांगितलं. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारनं उपाय योजल्याची त्यांनी सांगितलं. मराठवाड्याचं हक्काचं पाणी मिळवून देण्याच्या योजनेला सरकारनं मान्यता दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. बळीराजा संजीवनी योजनेच्या माध्यमातून अर्धवट प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी केद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्याचं  त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवारमध्ये मोठं काम  झाल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या विभागात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेद्वारे तीन लाख रोजगार निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाडा पॉवर ग्रिड ही मराठवाड्याला पाणी पुरवण्यासाठीची अतिशय महत्त्वाची योजना असल्याचं सांगून, सरकार मराठवाड्यासाठी आवश्यक तेवढे निधी पुरवेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

 नांदेड इथल्या हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीचं काम लवकरच हाती घेण्यात येईल आणि इथे मराठवाडा मुक्ती संग्रामातली ऐतिहासिक माहिती तरुण पिढीला ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर सांगितलं.

 जालना इथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तसंच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

 लातूर इथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 उस्मानाबाद इथे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे जिल्ह्याची प्रगती होत असल्याचं खोतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. उस्मानाबादच्या बाजप कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते आज हिंगोली इथे ध्वजारोहण करण्यात आलं.

 नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात आज या दिनानिमित्त आमदार डी.पी.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठौड यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताचा जलदगतीनं विकास होऊन भारत जगातली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असं नमूद करत, पंतप्रधान नवभारताच्या निर्मितीचं स्वप्न साकार करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

 आज देशभरात विश्वकर्मा जयंती साजरी केली जात आहे. या जयंतीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्थापत्याच्या या निर्मात्यापासून आपल्याला नव्या निर्मितीची प्रेरणा मिळते, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज पक्ष प्रचाराचा प्रारंभ करतील. भोपाळच्या एका दिवसाच्या दौऱ्यामध्ये गांधी एका वाहन फेरीत सहभाग घेतील; तसंच कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करतील. 

****

 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोवीसावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार वैद्यकीय सेवा क्षेत्रातले ज्येष्ठ डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार भोकर तालुक्यातल्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाला मिळाला आहे.

****

 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ब गटात आज  अबुधाबी इथं  श्रीलंका आणि अफगानिस्तानचा सामना होणार आहे. दुपारी साडेचार वाजता सामन्याला प्रारंभ होईल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघ अ गटात आपला पहिला सामना उद्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार असून   संघाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध परवा होणार आहे.

*****

*** 

No comments:

Post a Comment