Wednesday, 12 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 12 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

मुंबईतल्या राष्ट्रीय रसायने आणि खते या सरकारी कंपनीच्या मालकीची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरण - एम एम आर डी ए आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे.

प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत निश्चित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती, असं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत मूल्य समर्थन योजना, खासगी खरेदी आणि साठवण योजना तसंच मूल्य तुट देयक योजना या एका छताखाली आणण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

राज्यात उत्पादीत होणाऱ्या दूध, कापूस आणि साखर या कृषी उत्पादनांसह दुध भुकटीची ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ व्हेल्स प्रांतानं खरेदी करावी, असं आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र आणि न्यू साऊथ वेल्स राज्यांमध्ये झालेल्या संसदीय करारानुसार ऑस्ट्रेलिया साऊथ व्हेल्सचे आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन मंत्री ब्रॅड हझार्ड यांनी निंबाळकर यांची आज विधानभवनात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं हझार्ड यांनी सांगितलं.

****

मुल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून, येणाऱ्या काळात हा कार्यक्रम अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं आज मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञान, कौशल्य आणि आकलनक्षमता वाढवण्यास मदत होत आहे, परंतु असं करताना शिक्षकांचं मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांचं गुणवत्तासंवर्धन यावर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

****

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटकप्रकरणी औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी जालन्यातल्या गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जुना जालन्यातल्या शनिमंदीर चौकात कपाळे याचं झेरॉक्स दुकान आहे. दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटकप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या जालन्यातल्या श्रीकांत पांगारकर याच्याशी गणेश कपाळे याची घनिष्ठ मैत्री होती. कपाळेच्या संगणकावरून पांगारकरनं काही इमेल्स पाठवल्याची माहिती पुढे येत असून, एटीएसनं कपाळेचं संगणकही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

****

पुणे जिल्ह्यातल्या भिमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयानं १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यासंदर्भात इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह अन्य चार जणांनी दाखल केलेल्या याचिकेवरही १७ तारखेला सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांनी २८ ऑगस्टला देशभरात छापे घालून सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती.

****

गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या ठिकठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात येईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रगती, शांती, आनंद आणि समृद्धी या मार्गावर चालण्यासाठी गणपती बप्पा आपल्याला मार्ग दाखवेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बाजारपेठा सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. पर्यावरणपुरक गणेश मूर्तीला यंदाही प्रोत्साहन मिळालं असून, शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णयही घेतला आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी-परुळे विमानतळावर आज सकाळी विमान उतरवण्याची चाचणी घेण्यात आली. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी खासगी बारा आसनाचं विमान चिपी विमानतळावर उतरल्यावर ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी या विमानाचं स्वागत केलं. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते. विमानाच्या चालकांचा पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

धुळे इथल्या ग.स.बँकेत पाच कोटी ४९ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे तत्कालिन अध्यक्ष चंद्रकांत देसले यांच्यासह विद्यमान संचालक मंडळ आणि बँक अधिकाऱ्यांसह ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २००८ ते १० आणि २०१५-१६ झालेल्या या गैरव्यवहाराप्रकरणी शासकीय लेखा परीक्षक वसंत राठोड यांनी तक्रार दाखल केली होती.

****

No comments:

Post a Comment