Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 13 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
विविध
बँकाचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये कर्ज बुडवलेल्या विजय मल्याला, देशाबाहेर पळून जाण्यास
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप, काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी
यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. संसदेच्या केंद्रीय
सभागृहात जेटली आणि मल्लया यांना, काँग्रेस नेते खासदार पी एल पुनिया यांनी एकत्र पाहिल्याचं,
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एक मार्च २०१६ रोजी ही भेट झाली आणि दुसऱ्याच दिवशी
दोन मार्चला मल्ल्या पसार झाल्याचं, वृत्तवाहिन्यांकडून समजल्याचं, गांधी म्हणाले.
या संदर्भात अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान,
गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विजय मल्ल्या याला
सहकार्य केल्याचं, भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी
यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस सरकारनं मल्ल्याला मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यासाठी
बेलआऊट पॅकेज मिळवून दिलं, मल्ल्या याला गांधी कुटुंबीयांनी मोठी सूट मिळवून दिल्यानंच
२०१० पासून त्याने सर्व नियम धाब्यावर बसवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं, गोयल म्हणाले.
राहुल गांधी यांनी मल्लयासोबतचे आपले संबंध उघड करावेत, असंही गोयल म्हणाले.
****
सैन्य
दलानं जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ अतिरेक्यांचे
घुसखोरीचे प्रयत्न आज हाणून पाडले. तीन अज्ञात अतिरेकी या कारवाईत मारले गेले. सैन्यदलाच्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेत्रात घुसखोरी रोखण्याची कारवाई अद्यापही सुरू
आहे. आज सकाळी काश्मीरमध्ये एका घुसखोरालाही अटक करण्यात आली, तो पाकिस्तानतल्या हाजरा
तालुक्यातला रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान,
हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या एका दहशतवाद्याला, आज उत्तर प्रदेशात कानपूर
इथं अटक करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात त्याचा घातपाताचा कट असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
देशातील
पहिल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल मोबाईल ॲपचं, आज नवी दिल्लीत अल्पसंख्याक मंत्री
मुख्तार अब्बास नक्वी यांनी लोकार्पण केलं. गरीब आणि मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांना
या व्यवस्थेच्या माध्यमातून विनासायास शिष्यवृत्ती प्राप्त होईल, अशी माहिती नक्वी
यांनी यावेळी दिली. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती गरजू विद्यार्थ्यांच्या
बँक खात्यात टाकल्या जात असल्याचंही नक्वी यांनी यावेळी सांगितलं.
****
ज्येष्ठ
नागरिकांना आणीबाणीच्या काळात मदतीसाठी इंटरनेट आणि जीपीएस आधारित आणिबाणी सतर्कता
सेवा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं पोलिस विभागाला दिले आहेत. सर्व जिल्हा तसंच
विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मदतवाहिनी हेल्पलाईन स्थापन करण्यासही
सरकारनं सूचित केलं आहे. वैद्यकीय किंवा इतर आपत्तीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक या मदत
वाहिनीवरून मदत मिळवू शकतील. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असलेली प्रकरणं प्राधान्यानं
पोलीस विभागानं निकाली काढावीत, एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची ठराविक काळानं
भेट घेण्यासही सरकारनं पोलीस विभागाला सूचित केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गणेशोत्सवाला
आजपासून हर्षोल्हासात प्रारंभ झाला. राज्यात आज सकाळी घरोघरी मोठ्या भक्ती भावानं गणेशाची
स्थापना झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची
प्रतिष्ठापना केली. बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि
नागरिकांना सुखसमाधान, चांगलं आरोग्य मिळावं, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
लोकमान्य
टिळकांनी जात, धर्म, भाषा, पंथ यापलीकडे जाऊन लोकांनी संघटित व्हावं या उद्देशानं सार्वजनिक
गणेशोत्सव सुरू केला. सामाजिक अभिसरणासाठी त्यांनी सुरु केलेलं हे पर्व अव्याहत सुरु
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे, अशी प्रार्थना
करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
****
दरम्यान,
सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशांची स्थापना अनेक ठिकाणी सध्या सुरू आहे. जालना जिल्ह्यात
ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं उत्साहात आगमन सुरू आहे. ढोल पथकं हेच या वर्षीच्या आगमन
मिरवणुकांचं मुख्य आकर्षण असून शहरातल्या बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहे.
****
टोकियो
इथं सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतनं पुरुष एकेरीची
उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एच.एस.प्रणोय आणि पी.व्ही.सिंधूचं आव्हान मात्र उपउपांत्य
फेरीतच संपुष्टात आलं. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान उपउपांत्य
फेरीत संपुष्टात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment