Friday, 28 September 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

पराक्रम पर्व आजपासून साजरं होत आहे. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी कारवाईला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे पर्व साजरं करण्यात येत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात जोधपूर इथं हुतात्मा सैनिकांच्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ३० सप्टेंबर पर्यंत पराक्रम पर्व साजरं करण्यात येणार असून, या अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज १११ वी जयंती. त्यानिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. भगतसिंग यांच्या हौतात्म्यामुळे लाखो देशवासियांना प्रेरणा मिळाल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

****

भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्तानं संगीत आणि चित्रपट क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून लता मंगेशकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा मधूर आवाज जगभरातल्या रसिकांना मंत्रमुग्ध करतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे, तर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात देशाच्या विकासाबाबत लता मंगेशकर कायम उत्साही असल्याचं म्हटलं आहे.

****

ऑनलाईन खरेदी व्रिकीच्या निषेधार्थ अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज बंद पुकारला आहे.  देशभरातले सात कोटी व्यापारी तसंच २० हजार व्यापारी संघटना या बंद सहभागी होत आहेत. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार आणि ऑनलाईन कंपन्यांमुळे पारंपारिक किरकोळ व्यापार संकटात आला आहे, यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार धोरण आखत नसल्याचं महासंघानं म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली सुमारे ५० हजार व्यापारी प्रतिष्ठानं या बंदमध्ये सहभागी होत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनी स्वतंत्र बंद पुकारला आहे. त्यामुळे आज औषध दुकानंही बंद राहण्याची शक्यता आहे.

//************//


No comments:

Post a Comment