Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 1 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ ऑक्टोबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राज्यात असलेल्या प्लॅस्टिक बंदीचं
उल्लंघन करत अशा वस्तूंचं उत्पादन करत असलेल्या कंपन्यांवर आजपासून कारवाई सुरू करण्यात
येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना
दिले. किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण
करण्याची मुदत काल संपल्यानंतर मंडळानं हे निर्देश दिले आहेत. या वर्षीच्या २३ मार्चला
राज्य सरकारनं काही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घोषित केली होती आणि ती
२४ जूनपासून लागू झाली होती.
****
स्वच्छता हा महात्मा गांधी यांच्या जीवनातील
सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता, असं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते राजकोटमध्ये एका सभेत काल मार्गदर्शन करत होते. गांधीजींना स्वच्छता
आणि स्वातंत्र्य यात निवड करायची असती तर त्यांनी स्वच्छतेची आधी निवड केली असती, येवढी त्यांची स्वच्छते संदर्भातील
वचनबद्धता होती, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं. गेल्या चार वर्षांतील्या कार्यकाळात स्वच्छतेसंदर्भात
मोठं काम झालं असल्याचं माहिती त्यांनी
दिली.
स्वच्छता २०१४मध्ये केवळ ३५ टक्के होती आता ती ९५ टक्के झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटमध्ये महात्मा गांधी संग्रहालयाचं यावेळी उदघाटन
झालं.
****
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या
कारकीर्दीचा आज शेवटचा दिवस असून, त्यांच्या नंतर सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन
गोगोई येत्या तीन तारखेला शपथ घेणार आहेत.
****
निवडणूक प्रचाराच्या काळात निवडणूक प्रक्रियेच्या
पावित्र्यावर परिणाम करेल, अशा कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या मंचाचा वापर होऊ देणार
नाही, असं आश्वासन गूगल या प्रमुख इंटरनेट कंपनीनं आणि फेसबुक आणि ट्विटर या समाज माध्यमांनी निवडणूक आयोगाला
दिलं आहे. या आश्वासना संदर्भात एक छोटी प्रायोगिक चाचणी पार पडली असून, लोकसभा निवडणुकी
पूर्वी एक मोठी चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत
यांनी दिली आहे.
****
या वर्षीचा पावसाळा संपल्याचं भारतीय हवामान
खात्यानं घोषित केलं असून, यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या एक्क्याण्णव टक्के
इतक्या पावसाची नोंद झाल्याचं जाहीर केलं आहे. हा पाऊस सर्वसाधारण श्रेणीच्या खालच्या
श्रेणीचा असल्याचंही हवामानखात्यानं म्हटलं आहे.पावसाळा संपला असला तरीही महाराष्ट्र
आणि गोव्यात या आठवड्यात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथे राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पथकानं धाड घालून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या
प्रमाणात विक्री करणाऱ्या सव्वीस विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. नांदेड जिल्ह्यात
कोणत्याही ठिकाणी तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थाची विक्री होत असल्याचं दिसून आल्यास
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या
अभियानाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून
जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत चार
हरणांचा मृत्यू झाल्यानं वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केल्याचं आमच्या वर्ताहरानं
कळवलं आहे. देवरी तालुक्याला लागूनच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा असून,
या प्रकल्पातले वन्यजीव ज्या ठिकाणाहून नेहमी रस्ता ओलांडतात, त्या ठिकाणी उड्डाण पूल
बांधावा अशी मागणी गोंदीया जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे
केली आहे.
****
प्रख्यात कवी, लेखक आणि गीत रामायणकार
ग.दि. माडगूळकर यांची आज जयंती आहे. हे वर्ष गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी, गीत रामायणकार गदिमांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, अशा शब्दांमध्ये
गदिमांना आदरांजली वाहिली आहे.
****
तुर्कस्थान मध्ये झालेल्या तिरंदाजी विश्व
चषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीनं महिला एकेरी गटात काल कांस्य पदक जिंकलं. या
स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं पुरुष एकेरी गटात कांस्य तर मिश्र दुहेरी गटात ज्योति
सुरेखा वेन्नमच्या साथीनं रौप्यपदक याआधीच जिंकल्यानं, भारताची या स्पर्धेतली पदकसंख्या
तीन वर पोहचली आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या,
एक दिवसीय क्रिकेटच्या ताज्या मानांकन यादीमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर तर शिखर
धवन पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. संयुक्त अरब अमिरातीत नुकत्याच पार पडलेल्या आशिया
चषक स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर या दोन खेळाडूंच्या मानांकनात ही सुधारणा झाली
आहे. भारताचा विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय संघाचा फिरकी
गोलंदाज कुलदीप यादवही गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment