Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 October 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४
ऑक्टोबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
रब्बी
हंगामातल्या गव्हासह सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा
निर्णय
§
औरंगाबादसह राज्यात
पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा उभारणार
§
परिवहन
निरीक्षकपदासाठीची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
आणि
§
शिवार
प्रतिष्ठानचा रूपाली दुधगावकर साहित्य पुरस्कार डॉक्टर पृथ्वीराज तौर यांना जाहीर
****
रब्बी हंगामातल्या गव्हासह सहा पिकांच्या किमान आधारभूत
किंमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं घेतला आहे.
गव्हाच्या आधारभूत दरात प्रतिक्विंटल १०५ रुपये वाढ करून ती एक हजार ८४० रुपये करण्यात
आली आहे. मसूरच्या दरात २२५ रुपयांनी वाढ करून चार हजार ४७५ रूपये, तर हरभरा दरात २२०
रुपयांनी वाढ करून किंमत चार हजार ६२० रूपये करण्यात आली आहे, करडईच्या दरात प्रति
क्विंटल आठशे पंचेचाळीस रुपये, बार्ली प्रति क्विंटल तीस रुपये, तर मोहरीच्या दरात
प्रतिक्विंटल २२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चापेक्षा किमान आधारभूत
किंमत ही कितीतरी पटीनं जास्त असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केंद्रीय
मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
****
अटल सौर कृषी पंप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य
मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. याअंतर्गत राज्यात सात हजार सौर कृषी पंप उपलब्ध करुन
देण्यात येणार असून, त्यापैकी २२ पूर्णांक पाच टक्के पंप अनुसूचित जाती आणि जमातींच्या
लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात
आर्थिक बचत होणार आहे.
किमान आधारभूत किंमत योजनेत धान भरडाईसाठी केंद्राच्या
दरा व्यतिरिक्त अतिरिक्त ३० रुपये प्रति क्विंटल दर देण्याचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळानं
घेतला आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १० रुपये प्रति क्विंटल दर दिला जातो.
संजय गांधी निराधार योजना’ आणि ‘श्रावणबाळ सेवा राज्य
निवृत्तीवेतन योजने’तल्या दिव्यांग व्यक्तींना देणात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासही
मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. याअंतर्गत आता ४० ते ७९ टक्के दिव्यांग व्यक्तींना
दरमहा ८०० रुपये, ८० टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना
दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची उत्पन्न
मर्यादाही एकवीस हजार रूपयांवरून पन्नास हजार रूपये करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला. राज्यस्तरीय प्रयोगशाळा नागपूर इथं राहणार असून, औरंगाबाद, अकोला,
धुळे आणि सोलापूर इथं महाविद्यालयस्तरीय प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी सामंजस्य
करार करण्यास काल मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळांतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक
आपत्ती व्यवस्थापनासाठी संशोधन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात
आलेल्या अल्प भूधारक शेतकऱ्यांचं खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय, कर्जमाफीसंदर्भात
नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं काल घेतला. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक
शेतकऱ्यांना येत्या एक नोव्हेंबरपर्यंत, आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट
आय एन स्लॅश इ एन स्लॅश या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
****
राज्य स्पर्धा परीक्षा मंडळानं गेल्या वर्षी घेतलेली
परिवहन निरीक्षकपदासाठीची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे
या पदासाठी निवड झालेल्या ८३३ उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
परिवहन विभागात उच्चशिक्षीत तरुणांनी यावं यासाठी, राज्य सरकारनं पात्रता परीक्षेच्या
अटी शिथिल केल्या होत्या. मात्र केंद्र सरकारचे नियम राज्याला शिथील करता येत नाहीत,
यासह अनेक मुद्दे उपस्थित करत राजेश फाटे नावाच्या तरूणानं नागपूर खंडपीठात याचिका
दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयाने हा निर्णय दिला.
****
भारताचे शेहेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती
रंजन गोगोई यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती
भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ
दिली. १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ते सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहतील.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे
प्रणेते ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन
करण्यात आलं. विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली
वाहिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पुढच्या वर्षीच्या हज यात्रेची तयारी सुरु झाली असून,
यात्रेची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येईल, असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार
मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली इथं काल हज यात्रेच्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. यावर्षीची हज यात्रा झाल्यानंतर लगेच पुढच्या यात्रेची
तयारी सुरु होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हणाले.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून दररोज सकाळी सहा वाजून
५० मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या या प्रादेशिक बातमीपत्राच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात
येत आहे. ७ ऑक्टोबर म्हणजे येत्या रविवारपासून हे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजून
१० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
शिवार चॅरिटेबल ट्रस्ट प्रतिष्ठानतर्फे
देण्यात येणारा रूपाली दुधगावकर साहित्य पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर
पृथ्वीराज तौर यांना जाहीर झाला आहे. वसुधैव कुटुंबकम या लेखसंग्रहासाठी तौर यांना
हा पुरस्कार मिळाला आहे. अकरा हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप
असून, येत्या बावीस तारखेला या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री विमा
सुरक्षा योजना अनेकांसाठी भविष्यातली आशा बनल्या आहेत. वार्षिक बारा रुपये आणि ३३०
रुपये हप्ता भरुन नागरिक या योजनेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबांचं भविष्य सुरक्षित
करत आहेत, या योजनेविषयी आपला अनुभव सांगत आहेत जालना जिल्ह्यातले दत्तू जाधव –
मी दत्तू जाधव,
राहणार जालना. मी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत
विमा काढला आहे. विमा हप्त्या पोटी दरवर्षी माझ्या बँकखात्यातून ३४२ रूपये कपात होतात.
त्यामुळे माझ्या पचश्यात कुंटूंबाला ४ लाख रूपये पर्यंतचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या
या विमा योजनेंमुळे माझ्या परिवाराचे भविष्य सुरक्षित झाले आहे. यामुळे मी शासनाचा
आभारी आहे.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या एकोजी मुदगड इथं मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या माध्यमातून
सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा महाजेनको
या कंपनीला हस्तांतरीत करण्याचे आदेश लातूरच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी, जारी केले आहेत. निलंगा तालुक्यात हा दुसरा सौर ऊर्जा
प्रकल्प असणार आहे. दोन मेगावॅटच्या या प्रकल्पासाठी अंदाजे नऊ कोटी रूपयांचा
खर्च अपेक्षित आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या करम इथं
वीज पुरवठा सुरळीत ठेवावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महावितरणच्या
उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. एका आठवड्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील,
असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
नवीन शिक्षण धोरणात भारतीय संस्कृतीचा अंतर्भाव असावा,
देशाभिमान आणि भारतीय मूल्यं रुजवणारं शिक्षण मिळायला हवं, असं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शोभा पैठणकर यांनी व्यक्त केलं आहे. ज्ञानोत्सव २०१८ या कार्यक्रमाचा काल उस्मानाबाद
इथं समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात राज्यातल्या
ऐंशी शिक्षण संस्था आणि शंभर शिक्षकांनी आपल्या उपक्रमांचं सादरीकरण केलं.
****
लातूर जिल्ह्यात कालपर्यंत, सरासरीच्या फक्त 63 टक्के
पाऊस झाला असून, खरीपाची पिकं वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातले सगळे
पाणी साठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश जारी केले आहेत. लातूर शहरातला
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महानगरपालिकाही विशेष प्रयत्न करणार असल्याचं पालिका आयुक्तांनी
सांगितलं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दोन कसोटी क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून राजकोट इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे
नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
*****
***
No comments:
Post a Comment