Saturday, 6 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.10.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 October 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑक्टोबर २०१ सकाळी .५० मि.

****



Ø भारत आणि रशिया दरम्यान आठ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

Ø रिजर्व्ह बँकेचं चौथं द्वैमासिक पतधोरण जाहीर, महत्त्वाच्या व्याजदरात बदल नाही

Ø राज्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रूपये कपात

Ø राज्यातल्या १७० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती

आणि

Ø राजकोट कसोटीत भारताचा पहिला डाव ६४९ धावांवर घोषीत; दिवसअखेर वेस्टइंडीजच्या सहा बाद ९४ धावा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात काल झालेल्या वार्षिक द्वी-पक्षीय बैठकीनंतर, उभय देशांदरम्यान आठ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मानवाला अंतराळात पाठवण्याच्या, ‘गगनयान‘ या भारताच्या, महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रशियाचं सहकार्य, तसंच रशियाची एस चारशे ट्रायंफ, ही संरक्षण प्रणाली भारतानं खरेदी करणं, यासंदर्भातल्या करारांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपती पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनं द्वी-पक्षीय धोरणात्मक भागीदारीला नवी दिशा मिळाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तर, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी, यांच्या विरोधात लढण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं पुतिन यांनी नमूद केलं.

****



 नक्षलवादासह कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका परिषदेत बोलत होते. नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्याची गरज व्यक्त करतानाच, शहरी नक्षली फक्त हिंसा भडकवू इच्छितात, असं त्यांनी नमूद केलं. नक्षलवादाचा बिमोड करण्यात सरकारला यश येत असल्याचंही राजनाथ सिंह  म्हणाले.

****



 भारतीय रिजर्व्ह बँकेनं काल आपल्या चौथ्या द्वैमासिक पतधोरणाची घोषणा करताना, महत्त्वाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही. या पतधोरणात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर स्थिर असून, रिव्हर्स रेपो दरही सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्क्यांवर कायम आहे. या वर्षीच्या उत्तरार्धासाठी याआधी वर्तवलेल्या महागाई दराच्या अंदाजात रिजर्व्ह बँकेनं कपात केली असून, आता हा दर तीन पूर्णांक नऊ ते चार पूर्णांक पाच टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा तर, सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज रिजर्व्ह बँकेनं वर्तवला आहे.

****



 राज्य सरकारनं काल डिझेलच्या दरांमध्येही दीड रूपया प्रतिलिटर कपात केली आहे. केंद्र सरकारनं डिझेलच्या दरात प्रतिलिटर अडीच रूपयांनी कपात केलेली आहे, त्यामुळे आता राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर चार रूपयांनी कमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक इथं या दरकपातीबाबत वार्ताहरांना माहिती दिली.



 तत्पूर्वी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचा ११५वा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ८१९ प्रशिक्षित पोलिस उप निरिक्षक अधिकाऱ्यांची तुकडी पोलीस दलात सामील झाली.

****



 राज्यातल्या १७० तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्यानं दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्याठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पीक कापणीनंतरचा अहवाल केंद्र शासनाला पाठवण्यात येईल आणि पुढील उपाय योजना करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक इथं काल पत्रकार परिषदेत दिली. नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मेट्रो ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****



 राज्यातल्या विविध तालुक्यातल्या पर्जन्यमान, पीक परिस्थिती, भूजल पातळी याची माहिती एकत्रित करून त्याचं विश्लेषण करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागानं ‘महा मदत’ या नवीन संकेतस्थळाची आणि ॲपची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल मुंबईत  झालं. ग्रामीण भागातल्या दुष्काळी परिस्थितीचं अचूक विश्लेषण करण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होईल, असं पाटील यांनी यावेळी बोलतांना यावेळी म्हणाले.

****



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं. यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्च पासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा २२ मार्च पर्यंत चालणार आहेत.

****



 या वर्षीचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झालं आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे रंगभूमी दिनानिमित्त हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येतं. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून दररोज सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या या प्रादेशिक बातमीपत्राच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात येत आहे. उद्या रविवारपासून हे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होईल.

****



 भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान राजकोट इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज संघाच्या सहा बाद ९४ धावा झाल्या. भारताच्या मोहम्मद शमीनं सर्वाधिक दोन बळी घेतले असून रोस्टन चेस २७ आणि केमो पॉल १३ धावांकर खेळत आहेत. त्याआधी, भारतानं आपला पहिला डाव नऊ बाद ६४९ धावांवर घोषित केला. यात कर्णधार विराट कोहलीच्या १३९, रविंद्र जडेजाच्या नाबाद १०० आणि ऋषभ पंतच्या ९२ धावांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशुनं सर्वाधिक चार तर शर्मन लेविसनं दोन गडी बाद केले.

****



 केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत संपूर्ण जालना जिल्हा उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबांकडे स्वत:चं शौचालय आहे. जिल्ह्यातल्या गोंदेगाव इथले या योजनेचे लाभार्थी सुभाष चवरे यांचा हा अनुभव –



मी सुभाष चवरे. राहणार गोंदेगाव, तालूका जिल्हा जालना. ‘स्वच्छ भारत अभियानातून’ आम्ही घरी शौचालय बांधले आहे. त्यासाठी आम्हाला बारा हजार रूपये अनुदान मिळाले. घरी शौचालय असल्यामुळे आता कुंटूंबीयांना उघड्यावर जावे लागत नाही. सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते. अन्य गावकऱ्यांना या शौचालय अभियानाचा खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी शासनाचा खूप आभारी आहे.

****



 इंधन दरवाढ मागे घ्यावी, बोंडअळीचं अनुदान तात्काळ वाटप करावं आदी मागण्यांसाठी जालना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीनं काल घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत आ़मदार राजेश टोपे यांनी जिल्ह्यात पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत सरकारच्या धोरणांवर टीका केली.

****



 पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काल नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधनाचे दर वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणावेत, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

****



 दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स सुरू करावेत या आणि इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या बोधेगाव इथल्या शेतकऱ्यांनी काल बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरची वाहतूक तीन तास बंद झाली होती. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****



 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सतरा तारखेला लातूर इथं भजनी मंडळांसह दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी दिली आहे. विरोधी पक्षात असताना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागणारे सत्तेत आल्याला चार वर्ष झाली तरी सोयाबीनला भाव मिळत नसल्याची सरकारला आठवण करून देण्यासाठी ही दिंडी काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोयाबीनला हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनसह इतर पिकांना शंभर टक्के पीकविमा लागू करावा, आदी मागण्याही संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.

****



 पुण्यात काल एका विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळच्या चौकात, जाहिरातींसाठी उंचावर लावलेली लोखंडी जाळी, सिग्नलवर उभ्या वाहनांवर कोसळून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रिक्षा तसंच काही दुचाकींचं मोठं नुकसान झालं.

****



 जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक नियुक्त करावं अशी मागणी जालना नगरपालिकेनं, औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे केली आहे.

*****

***

No comments:

Post a Comment