Tuesday, 9 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 9  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 केरळच्या सबरीमाला मंदीरात सगळ्या वयोगटातल्या महिलांना प्रवेशाची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दाखल पुनर्विचार याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं दिलेला हा निर्णय म्हणजे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आणि तर्कहिन असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. महिलांना मंदीरात प्रवेश नाकरणं म्हणजे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन आणि लैंगिक भेदभाव असल्याचं न्यायालयानं म्हटलं  आहे.      

****



 राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला सहकार्य करण्यासाठी सरकारनं ‘सामरिक धोरण गट’ स्थापन केला आहे. पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षा विषयक माहिती देणं तसंच सुरक्षा विषय धोरण बनवण्यात सल्ला देण्याचं काम ही परिषद करते. गटाचे अध्यक्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे असतील, तर नीती आयोगाचे अध्यक्ष, केंद्रीय सचिव, तीनही सैन्य दलाचे प्रमुख, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर, परराष्ट्र व्यवहार सुचिव, गृह, अर्थ आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव या गटाचे सदस्य असतील.

****



 वातावरण बदलाबाबतच्या आंतरसरकारी समितीनं वाढत्या जागतिक तापमानाबद्दल गंभीर इशारा दिला आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर दक्षिण कोरिया इथं समितीच्या झालेल्या बैठकीत वैज्ञानिक आणि विविध देशांचे सरकारी अधिकारी यात आठवडाभर विस्तृत चर्चा झाली, त्यानंतर समितीचा अहवाल जाहीर झाला. तापमान वाढ रोखण्यासंदर्भातल्या प्रयत्नापासून जग खूपच दूर गेलं असून, तापमानाची तीन अंश सेल्सिअस वाढीच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. ही वाढ दीड अंशापर्यंत रोखण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. यासाठी समाजात सर्वदूर पोचणारे मोठे बदल जलदगतीनं करणं गरजेचं आहे असं अहवालात म्हटलं आहे.

****



 केंद्र सरकारनं आयकर परतावा भरण्यासाठीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आयकर परतावा भरण्यासाठी तसंच विविध अहवाल सादर करण्यासाठीची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती, करदाते तसंच आयकर विभागाच्या मागणीवरुन ही मुदतवाढ देण्यात आली.

****



 परिचारिका आणि आरोग्य सेविका पायाभूत वैद्यकीय सेवा पुरवत असल्यानं त्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत दुसऱ्या ब्रिक्स परिचारिका मंचाचं उद्धाटन करताना बोलत होते. वैश्विक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं परिचऱ्या क्षेत्राच्या योगदानाबाबत ब्रिक्स देशांमधे संवाद आणि सामंजस्य वाढवणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 विजेची मागणी वाढल्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये आगामी काळात भारनियमन अनुभवावं लागेल, अशी माहिती उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या काळामध्ये सरासरी १६ हजार मेगावॅट विजेची मागणी असते. यंदा मात्र ही मागणी सुमारे २० हजार मेगावॅटवर पोहचल्यानं हा तुटवडा निर्माण होत आहे. काही भागांमध्ये विज देयकांचा अत्यल्प भरणा केला जातो, तिथं थकबाकी वसुली व्हावी यासाठी भारनियमन करण्याचा निर्णय वीज मंडळानं घेतला असल्याचं उर्जा मंत्र्यांनी सांगितलं.

****



 केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या पोषण महिना कार्यक्रमामध्येउत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण चौदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक पाच पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावले आहेत. उद्या दिल्लीमध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****



 मुंबईत दादर इथल्या इंदू मिल परिसरात उभारला जाणाऱ्या, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या पूर्वतयरीची  पाहणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री  रामदास आठवले यांनी काल केली. इंदू मिलमधल्या जमीन सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे, तसंच स्मारकाचं  बांधकाम करण्यासाठी समुद्राचं पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत बांधली जाणार आहे. या सर्व कामाची पाहणी आठवले यांनी यावेळी केली.

****



 मानसिक विकलांग तसंच शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतन प्रदान आदेशात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या वित्त विभागानं घेतला आहे. यामुळे अशा अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

****



 जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ पदकं पटकावली असून, यात तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भालाफेकपटू संदीप चौधरीनं जागतिक विक्रमाची नोंद करत काल भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक पटकावलं.

****

***

No comments:

Post a Comment