आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचं आज
पहाटे मुंबईत निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चिकनगुनिया झाल्याच्या तक्रारीवरून देव
यांना गेल्या १० ऑक्टोबर रोजी मुंबईत दादर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं
होतं, उपचारादरम्यान, आज पहाटे त्यांचं निधन झालं.
शब्दप्रधान गायकी हे संगीत वैशिष्ट्य असलेल्या देव
यांना, गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार
असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत,
समूहगीत, लोकगीत, युगुलगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांवर यशवंत देव यांनी आपला वेगळा
ठसा उमटवला. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
होणार आहेत.
****
हिंगोली इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्रतापराव
देशमुख किल्लेवडगावकर यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर
कळमनुरी तालुक्यात, किल्लेवडगाव या त्यांच्या मूळ गावी आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार
आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्रामात देशमुख यांचं मोठं योगदान आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यात दोन्ही देशांत ३२ सामंजस्य करार झाले, तर ५७ जपानी कंपन्यांनी भारतात २५० कोटी डॉलरची गुंतवणूक करायचा निर्णय घेतला आहे, त्याबाबतच्या
सहमती पत्रांची देवाण घेवाणही करण्यात आली. टोकियो इथं दोन्ही देशांमधल्या १३ व्या वार्षिक
शिखर परिषदेत दोन्ही नेते पंतप्रधान
मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिनजो सहभागी झाले होते. तत्पूर्वी, दोन्ही
नेत्यांनी द्वीपक्षीय, प्रादेशिक, आणि जागतिक विषयावर चर्चा केली. त्यानंतर
झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत त्यांनी दोनास दोन संवादाची घोषणा केली. दोन्ही देशांनी
सागरी क्षेत्रात माहितीची देवाण-घेवाण आणि सहकार्य वाढवण्याबाबतच्या करारावरही स्वाक्षऱ्या केल्या.
****
अवैध गौण खनिज वाहतूक करताना बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी
निरूपमा डांगे यांनी पकडलेल्या टिप्पर मालकाला दोन लाख २१ हजार रूपयांचा दंड भरण्याची
नोटीस बजावण्यात आली आहे. चिखली तालुक्यातल्या बेराळा फाटा इथं डांगे यांनी हा टिप्पर
पकडला होता.
*****
***
No comments:
Post a Comment