Thursday, 4 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

केंद्र सरकारनं आज पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क दीड रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर तेल उत्पादक कंपन्यांनीही दरांमध्येही एक रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला, यामुळे या दोन्ही इंधनाचे दर देशभरात अडीच रूपयांनी कमी झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचं जेटली म्हणाले. या दरवाढीमुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर इंधनाचे हे दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनंही अडीच रुपयांची कपात करावी, यासंदर्भात सगळ्या राज्यांशी चर्चा करणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनानंतर महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी इंधनाच्या दरात अडीच रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रानं पेट्रोलच्या किमतीत अडीच रुपयांची कपात केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात आता पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे. डिझेलच्या दरात मात्र प्रतिलिटर अडीच रुपयेच कपात राहणार आहे.

****

अनुभव आणि संशोधन आधारित शिक्षण ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. सातारा इथल्या रयत शिक्षण संस्थेला ९९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सातारा इथं आज आयोजित शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालयं असून, रयत हे एक विद्यापीठ झालं पाहिजे, यासंदर्भात पुढच्या आठवड्यात आपण दिल्लीत बैठक घेणार असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं.

****

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी बँकेतल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर सध्या सुट्टीवर असून, त्यांच्या विरूद्ध व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, असं बँकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटीबध्द असून महिलांसाठी विविध शासकीय योजना राबवण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं ‘बेटी बचाओ- बेटी पढओ’ महिला सुरक्षा सन्मान सोहळ्यात बोलत होते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद इथल्या उद्योजिका सुप्रिया बडवे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी मराठवाड्यातली पहिली महिला गिर्यारोहक मनिषा वाघमारे आणि उद्योजिका देविका कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात विविध पाणी पुरवठा योजनांसाठी आणि शौचालय बांधकामासाठी ३६४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं आज पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत यावर्षी १०१ गावांसाठी ८५ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या फतीयाबाद इथं सोलापूर -धुळे महामार्गावरून असुरक्षितरित्या डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरनं आज अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. आज दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्गावरची वाहतूक थांबवून आग आटोक्यात आणली, नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. या घटनेत टँकर जळून खाक झाला.

****

लातूर जिल्ह्यात विवेकानंद कर्करोग रुग्णालयाच्यावतीनं लातूर कर्करोग नियंत्रण योजना राबवली जात आहे. या योजनेतून लातूर तालुक्यातल्या दहा ठिकाणी आतापर्यंत कर्करोग विषयक तपासणी आणि जाणीव जागृतीसाठी राज्य सरकारचा आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या सहकार्यानं शिबीरं घेण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा देवधर यांनी दिली. लातूर जिल्ह्यात सध्या मौखिक कर्करोगाचं प्रमाण अधिक असल्याचं कर्करोगावर उपचार करणारे डाँ. ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या रानगंध पुरस्काराचं वितरण येत्या सहा ऑक्टोबरला औरंगाबाद इथं होणार आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचं वितरण होणार होतं. पहिला रानगंध पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला आहे.

//**********//

No comments:

Post a Comment