Friday, 5 October 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 05.10.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 October 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०१ सकाळी .५० मि.

****

·       पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर पाच रूपये तर डिझेलच्या दरात लीटरमागे अडीच रूपये कपात    

·       अनुभव आणि संशोधन आधारित शिक्षण ही काळाची गरज - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

·       काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा काल जळगाव इथून प्रारंभ

·       २०११ पूर्वी गावठाण आणि सरकारी जमिनीवर बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय

आणि

·       मुंबईच्या पृथ्वी शॉचं कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच दमदार शतक

****

राज्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर पाच रूपये तर डिझेलच्या दरात अडीच रूपयांनी घट झाली आहे. केंद्र सरकारनं काल पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क दीड रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यासोबतच तेल उत्पादक कंपन्यांनीही दरांमध्ये एक रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारनंही मूल्यवर्धित करात कपात केल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर अडीच रूपये घट झाली, यामुळे राज्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर पाच रूपयांनी कमी झाला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांनीही करात कपात केल्यानं, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.

****

अनुभव आणि संशोधन आधारित शिक्षण ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. सातारा इथल्या रयत शिक्षण संस्थेला ९९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सातारा इथं काल आयोजित शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालयं असून, रयत हे एक विद्यापीठ झालं पाहिजे, यासंदर्भात पुढच्या आठवड्यात आपण दिल्लीत बैठक घेणार असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं.

****

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी बँकेतल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर सध्या सुट्टीवर असून, व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रारींची चौकशी सुरु आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं ‘उन्नत भारत अभियाना’ साठी राज्यातल्या १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. यात ३३ जिल्ह्यातल्या ७५ तांत्रिक तर ८५ अतांत्रिक शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २९ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

****

राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध म्हणून, काँग्रेसनं पुकारलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा काल जळगाव इथं प्रारंभ झाला. जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर इथं प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीनं काढलेल्या या यात्रेचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, हुसेन दलवाई आदी नेत्यांनी भाजपप्रणीत सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

****

महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटीबध्द असून महिलांसाठी विविध शासकीय योजना राबवण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं ‘बेटी बचाओ- बेटी पढओ’ महिला सुरक्षा सन्मान सोहळ्यात बोलत होते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद इथल्या उद्योजक सुप्रिया बडवे तसंच देविका कुलकर्णी, आणि मराठवाड्यातली पहिली महिला एव्हरेस्टवीर मनिषा वाघमारे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

****

२०११ पूर्वी गावठाण आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या घरांची ग्रामपंचायत स्तरावर नोंद घेऊन ती नियमित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतल्याचं ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. जालना पंचायत समितीच्या नूतन इमारत उभारणी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते. आवश्यक कर आकारणीनंतर ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांची नमुना क्रमांक आठमध्ये नोंद घेवून, ही घरं महिलांच्या नावे करण्यास प्राधान्य दिलं जाईल, असं ते म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून दररोज सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या या प्रादेशिक बातमीपत्राच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात येत आहे. सात ऑक्टोबर म्हणजे परवा रविवारपासून हे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होईल.

****

क्रिकेट -

मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू पृथ्वी शॉ नं कसोटी क्रिकेट पदार्पणातच दमदार शतक झळकावलं. राजकोट इथं कालपासून सुरु झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पृथ्वी शॉनं १३४ धावा केल्या. ८६ धावांची खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजारासोबत पृथ्वीनं दुसऱ्या गड्यासाठी २०६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. काल दिवसअखेर भारताच्या चार बाद ३६४ धावा झाल्या, कर्णधार विराट कोहली ७२ तर ऋषभ पंत १७ धावांवर खेळत आहेत.

****

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यानं भरीव कामगिरी केली आहे. नागरिकांना स्वतःचं शौचालय मिळाल्यामुळे गावातली अस्वच्छता आणि रोगराई कमी झाली आहे. दुगाव इथले रहिवासी दशरथ वाजे यांनी याविषयी आपला अनुभव सांगितला.

मला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधकामासाठी बारा हजार रूपये मिळाले.माझ्या शौचालयाचे काम पूर्ण होऊन शौचालयाचा वापर मी आणि माझे कुटुंब दररोज करत आहे. तरी शौचालयामुळे माझ्या कुटुंबाचे आरोग्य स्वस्थितीत राहून मी आणि माझ्या कुटुंबात या योजनेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा गावातील नागरिकांना फायदा झाला आहे.

****

परभणी जिल्ह्यात विविध पाणी पुरवठा योजनांसाठी आणि शौचालय बांधकामासाठी ३६४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं काल पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत यावर्षी १०१ गावांसाठी ८५ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याचं ते म्हणाले.

****

संत जगमित्र सूतगिरणी कर्ज थकबाकीप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाला अंबाजोगाई न्यायालयानं स्थगिती दिली आहे. गेल्या पाच सप्टेंबरला याच न्यायालयानं हे आदेश दिले होते. यासंदर्भात आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नसल्यानं, या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी मुंडे यांनी न्यायालयाकडे केली होती.

****

लातूर जिल्ह्यात विवेकानंद कर्करोग रुग्णालयाच्या वतीनं ‘लातूर कर्करोग नियंत्रण योजना’ राबवली जात आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग, आणि आशा तसंच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आतापर्यंत लातूर तालुक्यात दहा ठिकाणी तपासणी आणि जाणीव जागृती शिबीरं घेण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अरुणा देवधर यांनी दिली. लातूर जिल्ह्यात मौखिक कर्करोगाचं प्रमाण अधिक असल्याचं डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितलं.

****

पोषण महाअभियानांतर्गत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा गांधी जयंती दिनी गौरव करण्यात आला. मुंबई इथं, ‘पोषण माह पुरस्कार वितरण’ आणिसबकी योजना सबका विकासअभियानाच्या उद्‌घाटन प्रसंगी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कोलते यांना गौरवण्यात आलं.

****

नांदेड ते जम्मूतावी ही नवी हमसफर साप्ताहिक रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. अकोला मार्गे धावणारी ही गाडी नांदेडहून दर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता ही रेल्वे जम्मूतावीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी जम्मूतावीहून दर रविवारी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल, आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नांदेड इथं पोहचेल.

****

लातूर जिल्ह्यात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह काही काळ पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात गारपीटही झाली. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं. काही घरांवरचे पत्रे उडाल्यानं पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातही उमरगा तसंच वाशी परिसरात पाऊस झाल्यानं, पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. बीड जिल्ह्यातही आष्टी तसंच केज तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात आजपासून ४४ व्या एकांकिका महोत्सवाला प्रारंभ होत आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात १९ एकांकिका सादर होणार आहेत.

//**********//


No comments:

Post a Comment