Monday, 1 October 2018

Text- AIR NEWS EVENING BULLETIN AURANGABAD 01.10.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ ऑक्टोबर  २०१८ सायंकाळी ६.००

****

भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान आज कृषी, पर्यटन, आरोग्य आणि औषधं क्षेत्राशी संबंधित तसंच तस्करी रोखण्या संदर्भात एकूण सतरा सामंजस्य करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्जियोयेव यांच्यामध्ये आज नवी दिल्ली इथं या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

****

मानवाधिकार हे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना पिढ्यानपिढ्या मिळणारे अधिकार असून, त्यांचं रक्षण करणं हे सरकारचं प्रमुख कर्तव्य आहे, असं मत उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संमेलनामध्ये आज नवी दिल्ली इथं बोलत होते. मानवाधिकार आयोगानं कार्याची पंचवीस वर्षं पूर्ण केल्याबद्दल आयोगाला शुभेच्छा देतानाच, आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या, हे लोक आपल्या अधिकारांबाबत जागरूक झाल्याचं आणि आयोगावरच्या त्यांच्या विश्वासाचं चिन्ह आहे, असं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं.

****

ज्येष्ठांचा सन्मान करणं ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, असं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्यानं नवी दिल्लीत आज झालेल्या वयोश्रेष्ठ सन्मानांच्या वितरणानंतर ते बोलत होते.

****

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात ते आज बोलत होते. राज्यात दुष्काळाचं संकट असून, काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असं नमूद करत, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं काही दिवसांपूर्वी टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, याचा उल्लेख पवार यांनी यावेळी केला. राफेल विमान खरेदीची माहिती सरकारनं संसदेत द्यावी, अशी मागणी करत, बोफोर्स खरेदीवर टीका करणारे राफेल खरेदीबाबत गप्प का आहेत, असा प्रश्नही पवार यांनी यावेळी केला.

****

शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं, तसंच इथून बेंगलुरु, इंदूर आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळानं आज आपल्या कामाचं एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विटसंदेशातून अभिनंदन करताना ही माहिती दिली आहे.

****

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं, या प्रमुख मागणीसाठी खासदार संजय जाधव यांनी सुरू केलेल्या सर्वपक्षीय आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात आजपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. या आंदोलनाचे धरणे, विद्यार्थ्यांचा घेराओ आणि महिलांचं निवेदन, हे तीन टप्पे याआधी पार पडले आहेत. या आंदोलनाची दखल घेत, शासनानं यासंदर्भातली पाहणी करण्यासाठी नुकतीच एक समिती परभणीत पाठवली होती, आणि ही समिती लवकरच आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे, मात्र, महाविद्यालय मंजूर होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

****

प्रवाशांची मागणी लक्षात घेत रेल्वेनं काही एक्सप्रेस गाड्यांना काही स्थानकांवर थांबे देण्याचा तसंच काही गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, नांदेड ते पनवेल विशेष गाडीला गंगाखेड इथं तर ओखा-रामेश्वरम  एक्सप्रेसला नंदुरबार इथे थांबा देण्यात आला आहे. सध्या हे थांबे सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.तसंच,नांदेड-मुंबई-नांदेड,तिरुपती-शिर्डी-तिरुपती आणि मनमाड-धर्माबाद-मनमाड या गाड्यांमध्ये प्रत्येकी एक डबा येत्या एक नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची  माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.

रेल्वेमार्गाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे नांदेड विभागाच्या काही गाड्या आजपासून येत्या सहा तारखेपर्यंत रद्द किंवा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्ण रद्द झालेल्या गाड्यांमध्ये,पुणे-निझामाबाद-पुणे आणि निझामाबाद–पंढरपूर-निझामाबाद या गाड्यांचा समावेश आहे, तर नांदेड-दौंड ही गाडी कोपरगाव-दौंड दरम्यान रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर पांढरीपूल इथे आज एक स्कॉर्पिओ गाडी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. जखमींना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

उद्या दोन ऑक्टोबर,महात्मा गांधी यांच्या जयंतीचा हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयेाजन करण्यात आलं आहे.

//***********//






No comments:

Post a Comment