Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा
आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं दाखल केलेल्या अहवालावर सरकारचा कृती अहवाल या
हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत
सांगितलं. आरक्षणाच्या मुद्यावरुन आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कामकाजात वेळोवेळी
व्यत्यय आला. मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल, असंही मुख्यमंत्री
म्हणाले. आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यावरून झालेल्या गदारोळामुळे
विधान परिषदेचं कामकाज स्थगित करावं लागलं. या गदारोळातच २०१८-१९ च्या २० हजार ३२६
कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर करण्यात आल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
तातडीनं मदत जाहीर करेपर्यंत, तसंच मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर होत
नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेत, विरोधी पक्षनेते धनंजय
मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. कर्जमाफी, बोण्ड अळी तसंच पीक विमा योजनेत सरकारनं
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही मुंडेंनी यावेळी केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.
****
शिक्षकांच्या
सेवाज्येष्ठतेचा प्रश्न येत्या १५ डिसेंबरच्या आत निकाली काढू, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली. याप्रकरणी शिक्षण विभाग, विधी विभागाचं मत
मागवावं लागतं, त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू
आणि निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. अनुदानासाठी पात्र १६८ आश्रमशाळांच्या अनुदानाचा
प्रश्र्न डिसेंबरपर्यंत मार्गी लागेल असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी
विधान परिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला
होता.
वैद्यकीय
रुग्णालय अधिष्ठातांना तातडीच्या प्रसंगी स्थानिक स्तरावर प्रती दिन पाच हजार रुपयांच्या
औषध खरेदीचे अधिकार होते, ते आत प्रती दिन एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचं वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितलं.
****
आगामी
दोन-तीन वर्षात राज्यातले कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळवण्यात येणार असून,
त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होईल, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
आज विधानसभेत सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या कृषीपंपांना वीज पुरवठ्यासाठी उच्च दाब
वितरण प्रणाली योजनेअंतर्गतची कामं खासगी संस्थेला दिल्याबद्दल सदस्य विजय भांबळे यांनी
लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
****
गोवर-रुबेला
सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये
सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. मुंबईत आज गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद
इथं जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.
बीड
जिल्ह्यात लसीकरण मोहीमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आरोग्य सभापती
राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. आरोग्य विभागानं या संदर्भात उपाययोजना केल्याचं
जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.
लातूर
इथं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते या मोहीमेचा शुभारंभ झाला. तर जालना इथं
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपली कन्या ओवी हिला लस टोचून घेत मोहिमेचा शुभारंभ
केला.
****
राज्य
शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
यंदा ज्येष्ठ बासरी वादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य
मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात
प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास राज्य शासनातर्फे हा पुरस्कार दिला
जातो. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
शेतकऱ्यांच्या
विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगाबाद इथं आज मोर्चा काढला.
कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार रूपये भाव, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या
मुलांना सरसकट मोफत शिक्षण देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. पैठण
गेट इथं मोर्चाला प्रारंभ झाला. विभागीय आयुक्तालयात जाऊन आंदोलकांनी निवेदन दिलं.
****
प्राप्तीकर
विभागानं औरंगाबाद इथं आज शासकीय कर्मचाऱ्यांसाठी टीडीएस - स्त्रोताच्या ठिकाणी कर
कपातीवर कार्यशाळा घेतली. आयुक्त आदर्श कुमार मोदी यांनी यात मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment