Friday, 16 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

विश्वासार्हता जपणं हे माध्यमांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय मुद्रण पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक माध्यमांच्या वाढीमुळे प्रसार माध्यमांवर दबाव टाकणं अशक्य आहे, हे केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्याचं ते म्हणाले. माध्यमांवर नियंत्रण अमान्य असल्याचं प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रारामौली कुमार प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं.   

****

औरंगाबाद इथंही जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय मुद्रण पत्रकारिता दिनानिमित्त “डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान” या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. डिजीटल पत्रकारितेचं सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणं गरजेचं असल्याचं मत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांनी यावेळी व्यक्त केलं. साधन आणि साध्य याचा योग्य तो मेळ बसवून त्याचा वापर हा विधायक कामांसाठीच केला जाणं, हे भान वापरकर्त्यांनी प्राधान्यानं जपणं हे डिजीटल पत्रकारितेसमोरचं आव्हान असल्याचं त्यांनी नमूद केलं.

बीड तसंच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातही राष्ट्रीय मुद्रण पत्रकारिता दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  

****

राज्य शासनानं राज्यातल्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून, यावर तात्काळ उपाययोजना लागू करण्यासाठी केंद्र शासनाकडे ७९०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते आज सोलापूर इथं वार्ताहारंशी बोलत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार असल्यामुळे समाजानं आंदोलन करून शासकीय कामकाजामध्ये व्यत्यय आणू नये, असं ते म्हणाले.

****

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ते आज ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला तात्पुरतं आरक्षण हवं की टिकावू आरक्षण हवं याचा निर्णय मराठा समाजानं घ्यायला हवा, असं तावडे यावेळी म्हणाले.

****

मराठा आरक्षणासोबतच आता धनगर समाजाला देखील राज्य सरकारनं आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धनगर आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे, असं पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. ते आज गोंदिया इथं बोलत होते. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून, धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारस करणं बाकी आहे, अशी माहिती जानकर यांनी यावेळी दिली. येत्या एक ते दीड महिन्यात केंद्र सरकारकडे शिफारस पाठवू असं ते म्हणाले.

****

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंत्री राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

****

अमरावती जिल्ह्याच्या वलगाव तालुक्यातल्या संत गाडगेबाबा निर्वाणभूमी इथं मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ३७ कोटी ८७ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

मुंबई विभागातल्या कल्याण रेल्वेस्थानकावर हाती घेण्यात आलेल्या कामामुळे जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस येत्या १८ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. तसंच या दिवशी दादर - जालना जनशताब्दी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.  

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात बांधकाम मजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. जिंतूर तालुक्यातले वाळू धक्के बंद असल्यामुळे बांधकाम मजुरांवर उपासमारी होत आहे, अनेक वेळी निवेदनं देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.

****

कोवलून इथं सुरु असलेल्या हॉंगकॉंग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या किदंबी श्रीकांतचं आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. जपानच्या केन्टा निशिमोटो या जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असलेल्या खेळाडुनं आठव्या स्थानावरच्या श्रीकांतला २१ - १७, २१ - १३ असं हरवलं.

****

No comments:

Post a Comment