Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 17
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø राफेल संदर्भात
सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय मागे घ्यावा - काँग्रेसची मागणी
Ø संरक्षण मंत्रालयापाठोपाठ
सर्वोच्च न्यायालयावरही काँग्रेसचा विश्वास नाही - पंतप्रधान
Ø राज्यातल्या एक
लाखाहून अधिक नोंदणीकृत अंगणवाड्यांमध्ये आठ लाख लाभार्थी बनावट
Ø भारतीय संग्राम
परिषदेचा बीड जिल्हा परिषदेत भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय
आणि
Ø वर्ल्ड टूर फायनल
स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीचं विजेतेपद
*****
राफेल कराराबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला
चुकीची माहिती दिली असून सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा आपला निर्णय मागे घ्यावा, अशी
मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. काँग्रेस नेते आनंदकुमार शर्मा यांनी काल नवी दिल्लीत
वार्ताहरांशी बोलतांना, शपथेवर खोटी साक्ष देणं आणि न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सरकारला
नोटीस देण्याचीही मागणी केली. राफेल विमानांच्या किंमतीवरुन कॅगचा अहवाल संसदेच्या
लोकलेखा समितीसमोर सादर केल्याचं सांगून सरकारनं विशेषाधिकाराचा अवमान केला असल्याचं
ते म्हणाले. संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीचा त्यांनी यावर पुनरुच्चार
केला.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणी संरक्षण मंत्रालयापाठोपाठ
आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर काँग्रेसचा विश्वास राहिला नसल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशात रायबरेली इथं त्यांच्या हस्ते काल एक
हजार कोटी रूपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. खोटेपणा
हा काँग्रेसच्या राजकारणाचा पाया असून ते म्हणाले. काँग्रेस पक्ष देशाला कमकुवत करत
असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
राफेल लढाऊ विमान खरेदीतला ४० हजार कोटी रुपयांचा
भ्रष्टाचार हाच आमचा आगामी निवडणुकीतला प्रमुख मुद्दा असेल, असं माजी मुख्यमंत्री आणि
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
बोलत होते. विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा करासारख्या निर्णयामुळे बसलेल्या धक्क्यातून
देश अजून सावरलेला नसून, सरकारसोबत जागतिक दर्जाचा एकही अर्थतज्ज्ञ काम करायला तयार
नाही, अशी टीका त्यांनी केली.
****
गेल्या चार वर्षात देशांतर्गत सुरक्षेची स्थिती मोठ्या
प्रमाणात सुधारली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत
काल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्थेतही लक्षणीय
सुधारणा झाली असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविरुद्ध
कारवाई करण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला पूर्ण अधिकार दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकामात आपल्याला एक छदामही
मिळाला नाही, तर तो इतरांना देण्याचा प्रश्नच येत नाही तरी आपल्याला अटक झाली अशी खंत
माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी व्यक्त केली. ते काल ठाणे इथं माळी समाजाच्या राज्यस्तरीय
संमेलनात बोलत होते. ८०० कोटी रुपयांचं काम १०० कोटी रुपयांमध्ये करुनही ठेकेदारानं
मंत्र्याला ८५० कोटी रुपये देण्याचा प्रश्नच कुठे येतो असा सवालही त्यांनी केला.
****
मुंबईतल्या सागरी किनारा रस्त्याचं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल भूमिपूजन करण्यात आलं. येत्या चार वषार्षात हे काम केलं
जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे कोळी बांधवाचं नुकसान होणार नाही,
अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.
****
राज्यातल्या एक लाखाहून अधिक नोंदणीकृत अंगणवाड्यांमध्ये
एकूण ६१ लाख लाभार्थ्यांची नावं समाविष्ट असून त्यापैकी आठ लाख नावं बनावट आहेत, असं
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
अशा बनावट लाभार्थ्यांची नावं काढून टाकण्याचं काम मंत्रालयाकडून सातत्यानं केलं जातं
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अंगणवाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी केंद्र
सरकार चार रूपये ८० पैसे तर राज्य सरकार तीन रूपये २० पैसे अनुदान देतं.
****
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेनं
बीड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला आहे. काल बीड इथं झालेल्या
राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याच शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी
पत्रकार परिषदेत सांगितलं. भाजपाने कायम आपल्या पक्षा बरोबर दुर्व्यवहार केल्यामुळे
हा निर्णय घेण्यात आल्याचं मेटे यांनी सांगितलं. या राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत
अनेक महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले असल्याची माहिती मेटे यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
*****
चीनमधे ग्वांगझू इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या
वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं
आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २१ - १९, २१ - १७
असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. सिंधूचा २०१६ साली या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव
झाला होता, तर गेल्यावर्षी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या
दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात चार बाद १३२ धावा झाल्या. मोहम्मद शमीनं दोन,
तर जसप्रित बुमराह आणि इशांत शर्मानं प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताचा
पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला. भारत १७५ धावांनी पिछाडीवर आहे.
****
माध्यमं आणि पुरस्कारांमुळे साहित्याचं
मोठं नुकसान झालं आहे असं मत, यवतमाळ इथल्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर
इथं कोकण साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत बोलत होत्या. सामर्थ्यवान साहित्यासाठी साधनेची
आवश्यकता असल्याचं सांगत, क्षणिक प्रसिध्दी, टाळ्या, कौतुक आणि पुरस्कारांमध्ये गुंतून
पडलेले साहित्यिक संपतात, असंही त्या म्हणाल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं सुरू असलेल्या दोन दिवसीय शिक्षिका साहित्य संमेलनाचा
काल समारोप झाला. महिला साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं, जुनी निवृत्ती वेतन योजना
लागू करावी, अभ्यासक्रमात महिला लेखकांना प्राधान्य द्यावं, आदी ठराव या संमेलनात घेण्यात
आले.
****
चांगल्या मार्गाने जगण्यास इच्छुक अनाथ निराधार मुला
मुलींना प्रत्येकानं आपापल्या परीनं सहकार्य करण्याचं आवाहन, ज्येष्ठ पत्रकार राजीव
खांडेकर यांनी केलं आहे. ‘एकता निराधार संघा’च्या वतीनं औरंगाबाद इथं प्रस्तावित अनाथ
निराधार वसतीगृहाचं भूमीपूजन काल खांडेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्त्या राधा पेठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजक विवेक
देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या शुभा रिसबुड, एकता संघाचे संस्थापक सागर रेड्डी यावेळी
उपस्थित होते.
****
मुलांना शाळेतून दैनंदिन परिपाठातून पर्यावरण, संस्कृती,
नीतिमूल्यं याची माहिती देणं आवश्यक असल्याचं, विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर
यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं, कवी गणेश घुले लिखित सुंदर माझी शाळा या काव्यसंग्रहाचं
प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कवी दासू वैद्य यांनी यावेळी बोलताना, बाल मानसिकता
जाणून घेतल्या शिवाय बाल साहित्य लिहिता येत नाही असं मत व्यक्त केलं, तर ज्येष्ठ शाहीर
सुरेश कुमार वैराळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना, शिक्षकांनी कविता चालीत शिकवणं,
आवश्यक असल्याचं नमूद केलं. गायक श्रीराम पोतदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या काव्यसंग्रहातल्या
कविता सादर केल्या.
****
बीड जिल्ह्यातले हुतात्मा सैनिक सुभाष नागरगोजे यांच्या
स्मरणार्थ केज तालुक्यात बनकरंजा इथं जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या हुतात्मा
स्मारकाचं अनावरण जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते काल करण्यात आलं. १५ सप्टेंबर
१९९४ रोजी पश्चिम बंगालमध्ये शितलपूर इथं कोळसा तस्करांसोबतच्या चकमकीत नागरगोजे यांना
वीरमरण आलं होतं.
****
नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले नेते माजी नगरसेवक
एन. यू. सदावर्ते यांचं काल हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते.
सदावर्ते हे प्रभात नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे २५ वर्षे अध्यक्ष होते.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या केंद्रा
खुर्द इथं छोटी मालवाहू गाडी उलटून झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले. त्यापैकी पाच
जणांची प्रकृती गंभीर आहे. काल सकाळी हा अपघात झाला. जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे.
****
लातूर इथल्या प्रस्तावित नाट्यगृह आणि शादीखान्याच्या
कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार
यांनी काल दिली. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून विभागीय आयुक्त कार्यालयानं
यासंदर्भातला प्रस्ताव नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे, असं त्यांनी
सांगितलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment